Tue, Apr 23, 2019 22:06होमपेज › Pune › वाहतूकदारांचा देशव्यापी संप मागे 

वाहतूकदारांचा देशव्यापी संप मागे 

Published On: Jul 28 2018 1:39AM | Last Updated: Jul 28 2018 1:07AMपुणे : प्रतिनिधी

देशभरातील टोलनाक्यांवर ट्रकचालकांचा वेळ वाचण्यासाठी वर्षातून एकदाच टोल आकारण्यात येणार आहे. परिवहन संवर्गातील वाहनांच्या परवाना नूतनीकरणावेळी एकदाच टोल भरण्याची परवानगी केंद्र शासनाच्या वतीने देण्यात आली आहे. तसेच थर्ड पार्टी इन्शुरन्स 28 टक्क्यांवरून 15 टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे ऑल इंडिया ट्रान्सपोर्टच्या वतीने मागील आठ दिवसांपासून सुरू असलेले देशव्यापी चक्का जाम आंदोलन मागे घेण्यात आले आहे. यासंदर्भात नवी दिल्लीतील नॉर्थ ब्लॉक आणि परिवहन भवनात बैठक पार पडली. बैठकीला केंद्रीय रस्ते विकास मनुष्यबळ मंत्री नितीन गडकरी, अर्थमंत्री पीयूष गोयल, मलकन बल, कुलतरंगसिंग अग्रवाल, अमृतलाल मदान, प्रमोद भावसार, बाबा शिंदे उपस्थित होते.

ऑल इंडिया ट्रान्सपोर्टच्या वतीने विविध मागण्यांसाठी 20 जुलैपासून राज्यासह देशभरात चक्का जाम आंदोलन सुरू केले होते. प्रामुख्याने टोल आणि थर्ड पार्टी इन्शुरन्ससंदर्भातील मागण्यांवर संघटनांचा भर होता. स्कूलबस संघटना आणि माल वाहतूकदार संघटनांनी या आंदोलनास पाठिंबा दिला होता. अखेर शुक्रवारी (दि.27 ) झालेल्या बैठकीत केंद्र शासनाच्या वतीने विविध मागण्यांवर तोडगा काढण्यात आला. परिवहन संवर्गातील वाहनांना वर्षातून एकदा पासिंग करताना टोल भरण्याची परवानगी देण्यात आल्यामुळे आता तासन्तास रांगेत थांबावे लागण्यापासून ट्रकचालकांना दिलासा मिळाला आहे. 

तसेच थर्ड पार्टी इन्शुरन्स इन्शुरन्स 15 टक्के करण्यात आला असून, एक एप्रिल 2018 पासून ज्या ट्रकचालकांनी वाढीव थर्ड इन्शुरन्स जमा केला आहे, त्यांना परतावा दिला जाणार आहे. ट्रकचालक मालक संघटनांनी इ-वे बील, वस्तु सेवा कर (जीएसटी), प्राप्तिकर (इन्कमटॅक्स) या मागण्यांबाबतही केंद्र शासनाच्या वतीन तीन महिन्यात त्रूटी दूर करण्याचे आश्‍वासन देण्यात आले आहे. तसेच देशातील प्रत्येक ट्रकचालकांसह त्यांच्या परिवाराचा इन्शुरन्स उतरविण्यात येणार आहे. इन्शुरन्सची रक्कम मालकाकडून आकारण्यात येणार आहे. ऑल इंडिया ट्रान्सपोर्टच्या वतीने केंद्र शासनाकडे केलेल्या 70 ते 80 टक्के मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. अशी माहिती महाराष्ट्र राज्य वाहन चालक मालक व प्रतिनिधी संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी दिली.