Sun, May 26, 2019 14:39होमपेज › Pune › वाहतूक पोलिसाला शिवीगाळ 

वाहतूक पोलिसाला शिवीगाळ 

Published On: Feb 16 2018 1:50AM | Last Updated: Feb 16 2018 1:05AMपुणे : प्रतिनिधी

नो एन्ट्रीतून येणार्‍या मोपेडचालकाला पोलिसांनी थांबवून ई-चलन भरण्यास सांगितल्याच्या रागातून दोघांनी पोलिस कर्मचार्‍याला अपशब्द वापरत खाली पाडून जखमी केल्याची घटना बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास शुक्रवार पेठेत घडली. या प्रकरणी शोएब इनामुल्लाह मोहम्मद (27), जकी इनामुल्लाह मुहम्मद (44, संगमवाडी)  या दोघांना खडक पोलिसांनी अटक केली आहे.  याप्रकरणी खडक वाहतूक विभागातील पोलिस शिपाई धीरज शेलार यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  

यातील फिर्यादी व त्यांचे सहकारी विक्रम गंगाधर कांबळे हे खडक वाहतूक विभागात काम करतात. ते बुधवारी सायंकाळी  गोटीरामभय्या चौक येथे वाहतूक नियमन करत असताना अटक केलेले दोघे त्यांच्या मोपेडवरून नेहरू चौकाच्या दिशेने प्रवेश बंद (नो एन्ट्री) असलेल्या रस्त्याने आले. त्या वेळी पोलिस नाईक विक्रम कांबळे यांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला. त्या वेळी ते तेथे न थांबता शिवीगाळ करत पुढे निघून गेले. त्यानंतर धीरज शेलार यांनी त्यांना पुढे येऊन थांब़वले आणि नियमांचे पालन केले नाही म्हणून ई-चलन भरण्यास सांगितले. याचा राग आल्याने दोघांनी त्यांना अपशब्द वापरून त्यांचे दोन्ही पाय घट्ट धरून खाली पाडले. दोघांना अटक केली.   तपास महिला पोलिस उपनिरीक्षक चौधरी करत आहेत.