Fri, Jul 19, 2019 07:44होमपेज › Pune › सेवारस्त्यावरील अडथळे केव्हा दूर होणार?

सेवारस्त्यावरील अडथळे केव्हा दूर होणार?

Published On: Feb 10 2018 1:53AM | Last Updated: Feb 10 2018 1:39AM
पिंपरी : नरेंद्र साठे

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून सध्या प्रवास करणे म्हणजे मोठे कठीण झाले आहे.  मेट्रो, ‘बीआरटीएस’च्या कामांमुळे रस्ता अपुरा पडतो. ग्रेडसेपरेटर आणि सेवारस्ता असल्याने दापोडी ते निगडी हा प्रवास विनाअडथळा करता येत होता. सध्या मात्र, अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. सेवारस्त्याच्या बाजूला असलेल्या व्यावसायिकांमुळे ग्राहकांची वाहने थेट रस्त्यावर लावण्यामुळे दापोडी ते पिंपरीपर्यंत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीला सामोर जावे लागते; परंतु वाहतूक पोलिस याकडे  दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप  वाहनचालक करत आहेत.

दापोडी ते निगडीदरम्यान असलेल्या ग्रेडसेपरेटरमुळे वाहन चालकांना प्रवास करणे सुखकर होते; परंतु त्यातदेखील नेहमीच पालिकेच्या चुकीच्या नियोजनामुळे वारंवार ‘इन-आऊट’मध्ये बदल केले जात असतात. महामार्गावर एकाच वेळी मेट्रो आणि ‘बीआरटीएस’च्या कामामुळे रस्ता अपुरा झाला आहे, तर सेवारस्त्यावर होणार्‍या अनधिकृत पार्किंगवर वाहतूक शाखेकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. ‘बीआरटीएस’ची केवळ चाचणी झाली; परंतु सुरू होण्यास न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे; परंतु रस्त्यावर ‘बीआरटीएस’साठी बॅरिकेटिंग केल्यामुळे सेवारस्ता अधिकच लहान झाला आहे. काही ठिकाणी लहान-मोठे अपघात होऊनही दुरुस्तीशिवाय इतर उपाययोजना त्या ठिकाणी प्रशासनाकडून केल्या गेल्या नाहीत. 

खराळवाडीत रस्त्यावरच पार्किंग

महामार्गावर पुण्याकडे जाण्याच्या दिशेने खराळवाडीमध्ये विविध व्यावसायिक आणि कार्यालयांमुळे रस्त्यावर वाहनांचे पार्किंग केले जाते. मेट्रोच्या कामामुळे खराळवाडीतून ग्रेडसेपरेटरमध्ये जाण्यासाठी असलेले ‘इन’ बंद करण्यात आले. परिणामी सर्व वाहतूक सेवारस्त्याने सुरू आहे, तरी देखील वाहतूक पोलिस येथील वाहनांवर कुठलीच कारवाई करत नाहीत.

वाहनचालकांचा उलटा प्रवास

संत तुकारामनगरहून वल्लभनगरच्या भुयारी मार्गातून शंकरवाडीकडे जाण्यास बंदी असतानाही वाहन चालक शॉर्टकट घेण्यासाठी जीव धोक्यात घालून, समोरून येणार्‍या चालकांना अडथळा ठरेल अशी उलट दिशेने वाहने चालवतात. अशाच प्रकारे एचए कंपनी ते डेअरी फार्म रस्ता आणि खराळवाडी ते एचए कंपनी बोगदा असा महामार्गावरून  दुचाकीस्वार आणि रिक्षा चालक उलट दिशेने प्रवास करतात. 

फुगेवाडी बनले अपघातस्थळ

‘बीआरटीएस’चे बॅरिकेटिंग फुगेवाडीत  अर्धवट आहे.  फुगेवाडी बस थांब्यापासून पुढे (निगडीकडे) बॅरिकेटिंग केले आहे, तर दापोडीत उड्डाणपुलाच्या चौकापासून फुगेवाडी बस थांब्यापर्यंत बॅरिकेटिंग नाही. यामुळे वाहने वेगात जात असताना अचानक समोर बॅरिकेटिंग सुरू होते. यामुळे चालकांचे नियंत्रण सुटून अपघात होत आहेत. 

या ठिकाणी होते व्यावसायिकांमुळे वाहतूक कोंडी

दापोडीहून निघाल्यानंतर पहिल्यांदा सेवारस्त्यावर फुगेवाडीतील एका हॉटेलमुळे चारचाकी वाहनांच्या होणार्‍या पार्किंगमुळे इतर वाहनांना रस्ताच शिल्लक राहत नाही. जवळच चौकात वाहूतक पोलिस असतात; परंतु रस्त्याच्या बाजूला उभ्या केलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिस कारवाई करत नाहीत. पुढे कासारवाडीतील रेल्वे गेटच्या चौकातच रिक्षा रस्त्यावर थांबतात. त्या ठिकाणी काही दिवसांपासून मेट्रोचा सुरक्षारक्षक वाहतूक नियमन करण्यासाठी असतो; परंतु रिक्षा हटवण्यास वाहतूक पोलिस धजावत नाहीत.

आम्ही वारंवार कारवाई करत आहोत. दापोडी ते फुगेवाडीदरम्यान स्थानिक रहिवाशांच्या गाड्या रस्त्याच्या बाजूला लावलेल्या असतात. सेवारस्त्यावरील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
    - ए. आर. ओंबसे, पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा

विकासकामे होत आहेत, तर त्याला नागरिकांचा कधीच विरोध नाही; परंतु त्याबरोबरच पर्यायी व्यवस्था व्यवस्थित करणे काम प्रशासनाचे होते. सेवारस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असताना वाहतूक पोलिसांकडून योग्य नियोजन करणे आवश्यक होते;  परंतु तसे झाले नाही. सेवारस्त्याच्या बाजूला उभ्या करण्यात आलेल्या वाहनांवर कारवाई करणे गरजेचे आहे.
    - जितेंद्र जुनेजा, नागरिक