होमपेज › Pune › शिवकालीन-पेशवेकालीन पारंपरिक मिरवणूक

शिवकालीन-पेशवेकालीन पारंपरिक मिरवणूक

Published On: Aug 13 2018 1:22AM | Last Updated: Aug 13 2018 12:34AMपुणे : प्रतिनिधी

शिवकालीन मावळे आणि सरदारांचे वेश... पेशवेकाळातील पुण्याची संस्कृती... नऊवारी साडी नेसून नाकात नथ घालून सहभागी झालेल्या ज्येष्ठ महिला... काळी टोपी, पांढरा सदरा, काळा कोट, धोतर घालून सहभागी झालेले अस्सल पुणेकर आणि पेशवाई, मावळी, पुणेरी पगडी घालून शनिवार पेठेत काढलेल्या मिरवणुकीचे दृश्य पाहताना तब्बल 125 वर्षांपूर्वीच्या पुण्याचा भास होत होता.

मिरवणुकीच्या माध्यमातून जनमाणसाचे एकत्रिकरण करून सण-उत्सव साजरे करण्याची आपली संस्कृती आजच्या 21 व्या शतकात पुण्यातील एका गणेशोत्सव मंडळाने पारंपरिक मिरवणुकीतून दाखविली. निमित्त होते, शनिवार पेठेतील नेनेघाट गणेश मंडळ व व्यायामशाळेच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित मिरवणूक, स्मरणिका प्रकाशन आणि वाद्यपूजन कार्यक्रमाचे. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, विश्रामबाग पोलिस स्टेशनचे सहायक माहिती अधिकारी श्रीकांत शिंदे, मंडळाचे अध्यक्ष प्रकाश आठवले, कार्याध्यक्ष मंदार परळीकर, चंद्रकांत जोगळेकर यांसह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शनिवारपेठेतील वीर मारुती मंदिरात पूजन करुन या मिरवणुकीला प्रारंभ झाला. लहान मुले, तरुणाईसोबतच ज्येष्ठांनीही मोठ्या उत्साहात पारंपरिक वेशभूषा करुन मिरवणुकीत सहभाग घेतला. महिलांनी फुगड्या घालत पारंपरिक खेळ देखील सादर केले.पुण्यामध्ये 125 वर्षांपूर्वी कशा प्रकारे मिरवणूक काढली गेली असेल, याचे उत्तम उदाहरण मंडळाने पुणेकरांसमोर ठेवत यंदाच्या गणेशोत्सवाच्या तयारीचा श्रीगणेशा केला.