Wed, Jun 26, 2019 17:32होमपेज › Pune › मराठा समाजाच्या आंदोलनात व्यापार्‍यांचा सहभाग

मराठा समाजाच्या आंदोलनात व्यापार्‍यांचा सहभाग

Published On: Jul 25 2018 1:38AM | Last Updated: Jul 24 2018 11:36PMपिंपरी : प्रतिनिधी

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी औरंगाबाद येथे काकासाहेब शिंदे यांनी जलसमाधी घेतली. पिंपरी-चिंचवड शहर सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात हा कार्यक्रम घेण्यात आला.  या वेळी शहर बंदच्या आवाहनाला व्यापार्‍यांनी प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवली. शहरात बंदला संमिश्र प्रतिसाद देण्यात आला. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील शोकसभेला मराठा क्रांती मोर्चाचे मारुती भापकर, अभिमन्यू पवार, सतीश काळे, प्रवीण कदम, प्रवीण पाटील, जीवन बोर्‍हा़डे, सचिन निबांळकर, अश्‍विन ढेमाले, अभिषेक मस्के, विक्रम नानेकर, नकूल भोईर, सुमन तांबे, प्रशांत कानडे, किशोर भंडारी, विनायक जगताप, प्रवीण लांडगे आदी कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. 

राज्य शासनाचा निषेध नोंदविण्यासाठी दुकाने बंद ठेवण्यात आली. दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करीत पिंपरीतून मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा डांगे चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर जावून समारोप करण्यात आला. त्यांच्या आवाहनाला साथ देत शहरातील पिंपरी कॅम्प मार्केट, काळेवाडी, थेरगांव, चिखली, भोसरी, चिंचवडगाव, वाल्हेकरवाडी, वाकड, थेरगाव आदी ठिकाणी दुकाने बंद ठेवण्यात आली. 

मराठा समाज बांधवाच्या वतीने चिखली साने चौक ते थॅरमॅक्स चौकापर्यंत व्यापार्‍यांनी स्वतःहून दुकाने बंद केली; तसेच आषाढी एकादशी झाल्याने पंढरपुरातून सर्व वारकरी  परतीच्या मार्गावर आहेत. या बंद कालावधीत मराठा समाजाकडून रहदारीला कोणताही अडथळा येऊ नये, वारकर्‍यांना त्रास होईल असे वर्तन करू नये, असे आवाहन शहरातील सकल मराठा बांधवांच्या वतीने करण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत शासनाने मेगा भरती स्थगित करावी. मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्यावे.  राज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठ्यांसाठी घोषित केलेल्या 16 टक्केआरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अध्यादेश काढून त्यांचे त्वरित कायद्यात रूपांतरण करावे. अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेंतर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्‍तीचे आदेश द्यावेत, आदी मागण्या मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने करण्यात येत आहेत.