Wed, Jul 24, 2019 08:01होमपेज › Pune › भटक्या कु त्र्यांचेे होणार ‘ट्रॅकिंग’

भटक्या कु त्र्यांचेे होणार ‘ट्रॅकिंग’

Published On: Sep 10 2018 1:17AM | Last Updated: Sep 10 2018 12:18AMपुणे : प्रतिनिधी 

शहरात भटकी कुत्री किती आहेत, ती कुठे वावरतात, त्यापैकी किती जणांचे निर्बीजीकरण झाले आहे आणि किती जणांना रेबिज प्रतिबंधक लस दिली आहे, अशी इत्थंभूत माहिती आता एका क्‍लिकवर उपलब्ध होणार आहे. भटक्या कुत्र्यांबाबत आरोग्य विभागाच्या पशुवैद्यकीय विभागाने नवीन धोरण बनवले असून त्याद्वारे सर्व भटक्या कुत्र्यांची माहिती आता ऑनलाईन दिसणार आहे. त्यासाठी सॉफ्टवेअर बनविण्याचे काम सुरू असून त्यामध्ये ही सर्व माहिती भरली जाणार आहे. या धोरणाचा आराखडा 18 सप्टेंबरला मान्यतेसाठी स्थायी समितीसमोर  मांडण्यात येणार आहे. 

भटक्या कुत्र्यांची संख्या गंभीर बनलेली आहे. त्यातच शहरातील या कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली असून त्यांना पकडणे, निर्बीजीकरण करणे, लस देणे ही कामे आत्तापर्यंत चार स्वयंसेवी संस्थांकडून करण्यात येत होती. मात्र, या स्वयंसेवी संस्थांनी महापालिकेला अंधारात ठेवत ही जबाबदारी योग्यरित्या पार पाडली नाही. यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या ही लाखाहून अधिक होत आहे.

भटकी कुत्री ही सर्वसामान्यांना त्रासदायक ठरत आहेत. दररोज सरासरी 30 जणांना भटकी कुत्री चावत असल्याचे आढळून येत आहे. या  वाढत्या समस्येवर मात करण्यासाठी आता भटक्या कुत्र्यांना पकडणे, निर्बीजीकरण करणे आणि रेबिज प्रतिबंधक लस देणे ही सर्व कामे ‘ब्लू क्रॉस सोसायटी ऑफ पुणे’ या एजन्सीला देण्यात आली आहेत. 

शहरातील सर्व कुत्र्यांना पकडून त्यांचे ठिकाण व इतर बाबींची नोंद ही ऑनलाईनच सॉफ्टवेअरमध्ये करण्याचे काम संस्था पार पाडणार असल्याची माहिती पशुवैद्यकीय विभागाचे अधीक्षक डॉ. प्रकाश वाघ यांनी दिली.

असे होणार ट्रॅकिंग

कुत्र्यांना पकडल्यानंतर त्यांचे निर्बीजीकरण करण्यात येईल. ज्यांचे निर्बीजीकरण झाले आहे त्यांच्या गळ्यात विशिष्ट कोड असलेली चिप असलेला पट्टा बसविण्यात येणार आहे. त्यामुळे त्या कुत्र्याची माहिती कळणार आहे. जसे की तो कुत्रा कोठे आहे, जिवंत आहे की मेला आहे, हे सगळे  ‘ट्रॅक’ करण्यात येणार आहे.
कुत्र्यांनी घेतलेला चावा 
(जानेवारी ते जुलै 18)
  6939 चावे  9 रेबिजने झालेले मृत्यू