Thu, Apr 25, 2019 21:27होमपेज › Pune › आदिवासी बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा 

आदिवासी बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा 

Published On: Sep 06 2018 3:19PM | Last Updated: Sep 06 2018 3:19PMपुणे : प्रतिनिधी

धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये (एसटी) समाविष्ट करण्यासाठी शासनाने टाटा संशोधन संस्थेकडे धनगर समाजाचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे काम देण्यात आले आहे. हा अहवाल प्राप्त झाला असल्यास तो प्रसिद्ध करावा. आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागू नये. या मागण्यांसह धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीच्या दरम्यान काहींकडून आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था कार्यालयाची तोडफोड करण्यात आली त्याचा निषेधार्थ शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.

मोर्चामध्ये शहरातील अनेक राजकीय नेते देखील सहभागी झाले होते. तर आमदार वैभव पिचड यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. संपूर्ण पुणे जिल्ह्यातून आलेल्या महिलांची संख्या उल्लेखनीय होती. गुरूवारी सकाळी साडे अकरा वाजता या मोर्चास शनिवार वाड्यापासून सुरुवात झाली.  एक तीर एक कमान सारे आदिवासी एक समान, बोगस हटाव आदिवासी बचाव, बच्चे बच्चे को पढाना है आदिवासी को बचना है, आदिवासी विद्यार्थ्यांसाठीची डीबीटी योजना रद्दा करा आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर त्याचे सभेत रूपांतर झाले. जिल्हाधिकार्‍यांना विविध मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले.

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था ही महाराष्ट्र शासनाची आदिवासी समाजाचे न्याय हक्क जोपासणारी संस्था आहे. त्यामुळे कार्यालयात आदिवासींच्या रूढी, परंपरा, संस्कृतीची जोपासना करण्याचे तसेच आदिवासी जमातीच्या जीवनशैलीचे संशोधन व त्यांचे न्याय हक्क जतन करून संवर्धन करण्याची संस्थेद्वारे कामे केले जातात. या कार्यालयाची तोडफोड करून त्याठिकाणची पत्रके इतरत्र फेकले त्याचा तीव्र शब्दात निषेध यावेळी उपस्थितांनी केला. 

आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली भोजनाची डीबीटी योजनेचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा. शासकीय आश्रमशाळांमधील परिस्थिती सुधारण्याची देखील मागणी करण्यात आली. आदिवासी आश्रमशाळा, शासकीय आदिवासी वसतिगृहे, आदिवासी सहकारी सोसायट्या, विकास महामंडळातील कार्यालयांमध्ये रिक्त असलेल्या जागा त्वरित भरण्यात याव्यात, यासह आदी मागण्यांसह ढोलताशांच्या गजरात, हातात झेंडे घेऊन शेकडो आदिवासी बांधव जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.