Tue, Apr 23, 2019 09:36होमपेज › Pune › उपनगरेही गेली खड्ड्यांत सिंहगड, पानशेत रस्त्यावरील खड्ड्यांमुळे पर्यटक त्रस्त

उपनगरेही गेली खड्ड्यांत सिंहगड, पानशेत रस्त्यावरील खड्ड्यांमुळे पर्यटक त्रस्त

Published On: Jul 18 2018 1:54AM | Last Updated: Jul 18 2018 12:07AMखडकवासला : वार्ताहर

गेल्या पाच सहा दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सिंहगड,  पुणे  पानशेत रस्त्याची खड्डे पडून चाळण झाली आहे. धायरी ते नरहे रोड , डी.एस के रोड, किरकटवाडी ते नांदोशी रोड आदी अंतर्गत रस्त्यावरील  खड्ड्यात पाण्याची डबकी साठल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे. 

डबक्यातून राडारोडा तुटवत ये जा करताना वाहनचालक व पदचार्‍यानां मोठी कसरत करावी लागत आहे.  सिंहगडरोडवरील नांदेड सिटीच्या जवळील गणेश कार्यालयापासून   नांदेड फाटा, दळवीवाडीपासून किरकटवाडी  फाटा, कोल्हेवाडी, खडकवासला, गोर्‍हे बुद्रुक, डोणजे ,  खानापुर ते पानशेतपर्यंतच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामुळे या रस्त्यावरून वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या खड्ड्यांमुळे पर्यटक व नागरिक त्रस्त झाले आहे. मोठ मोठ्या  खड्ड्यात पावसाचे तसेच मैलापाणी साठल्याने दुर्गंधी पसरली आहे. अशा धोकादायक रस्त्यावर ये जा करताना  मोठी कसरत करावी लागत आहे.धायरी गावाकडे जाणार्‍या रस्त्यावर तसेच धायरी  दळवीवाडीच्या रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले आहे. सर्वात बिकट स्थिती किरकटवाडी फाटा ते कोल्हेवाडी दरम्यानच्या रस्त्याची झाली आहे .  

येरवडा, विश्रांतवाडीत वाहतुकीची कोंडी

येरवडा : वार्ताहर

संततधार पावसामुळे उपनगरातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. येरवड्यातील गुंजन चौक, आळंदी रस्त्यावर विश्रांतवाडीजवळ रस्ता, लोहगावच्या रस्त्यावर खड्डेच  खड्डे पडले आहेत. संततधार पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहतुक कोंडी 

होत आहे.  संततधार पडणार्‍या पावसामुळे नव्याने तयार करण्यात आलेले डांबरी रस्त्यावर मोठमोठे खड्डे झाले आहेत. येरवड्यातील मुख्य गुंजन चौक, नव्याने करण्यात आलेला पोरवाल रस्ता, लोहगावातील स्मशान भूमीजवळ, आळंदी रस्त्यावर विश्रांतवाडी ते प्रतीकनगर चौकादरम्यान खड्डे पडले आहेत. खड्ड्यात पाणी साचत असल्यामुळे वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे वाहने सावकाश चालवली जातात. परिणामी वाहतुक कोंडीत भर पडते.   गुंजन चौकात देखील मुख्य रस्त्यावर खड्डे पडले आहेत. संततधार पडणार्‍या पावसामुळे मुख्य रस्त्यांसह उपनगरातील अंतर्गत रस्त्यांवर देखील खड्डे पडले आहेत. पावसाने उघडीप दिल्यानंतर उपनगरातील खड्डे महापालिकेच्या वतीने तातडीने बुजवावेत अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. 

रेल्वे रुळाजवळील रस्ता खचला

खडकी : वार्ताहर 

संततधार पावसामुळे पुणे-मुंबई रस्त्यावरील खडकी रेल्वे स्टेशनसमोरील महामार्गावर पावसामुळे रस्ता खाली गेल्याने रेल्वे रुळ वर आले आहेत. लोखंडी रुळावर पावसामुळे दुचाकी वाहने स्लीप होण्याच्या घटना घडत असून अपघाताची शक्यता बळावली आहे. रेल्वे रुळाजवळील पडलेल्या खड्ड्याबाबत पुणे महानगरपालिकेच्या वतीने तातडीने उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी खडकीकर करीत आहेत.

पुणे-मुंबई महामार्गावरील खडकी रेल्वे स्टेशनसमोरील रस्त्यावर काही पेविंग ब्लॉक निघाल्यामुळे रस्ता खचला असून या ठिकाणी रेल्वे रुळाजवळच खड्डे पडले आहेत. त्यामध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहन चालकाला खड्ड्याचा अंदाज येत नाही, तर पावसामुळे रेल्वे रूळावरून दुचाकी वाहन घसरण्याच्या घटना घडत आहेत.पावसाच्या पाण्यामुळे रेल्वे रुळावरून गाडी गेल्याने दुचाकी वाहने घसरत असून अनेक दुचाकी वाहनचालकांची तारांबळ उडते, तर अनेक दुचाकी वाहने घसरून पडत असल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. महामार्गावरून मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू असून दुचाकी वाहने घसरत असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रस्ता खचल्याने याबाबत पुणे महानगरपालिकेच्या संबंधित विभागाला कळविण्यात आले होते, मात्र प्रशासनाने याबाबत कोणतीही गंभीर पावले उचलली नसल्याचे वाहतूक पोलिस शाखेचे पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी सांगितले.दरम्यान, पुणे महानगर पालिकेच्या वतीने रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात येत असून बोर्ड प्रशासन पुणे-मुंबई महामार्गाचे दुरुस्तीचे काम करीत नसल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. 

नळस्टॉप चौकात वाहनाच्या मोठ्या रांगा

पौडरोड : वार्ताहर

पुण्याचा एक उपनगर म्हणून कोथरूड भागाचा विकास झपाट्याने वाढत असताना या भागात अनेक समस्या निर्माण होत आहे. त्यात वाहतूक कोंडीची समस्या मोठ्याप्रमाणात आपले तोंड वर करत आहे. वाहतूक सुरळीत राहावी यासाठी प्रशासनकडून विविध उपाययोजना राबविले जातात.परंतु दोन दिवस पासून पावसाने जोरात हजरी लावल्यामुळे अनेक जागी सिग्नल बंद अवस्थेत दिसून आली. त्यात पौडरोडवरील  आणि  नळस्टॉपचा  सिग्नल मंगळवारी सकाळीपासून बंद असल्यामुळे वाहतुकीची कोंडी मोठ्याप्रमाणात झाली होती. रस्तयावरील खड्ड्यामुळे कोंडीमध्ये आणखी भर पडली. त्यामुळे सकाळच्या वेळीस कामावर जाणारे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला. तसेच वाहतूक कोंडी दूर करतांना ट्राफिक पोलिसांची सुद्धा तारांबळ उडाली. नळस्टॉप ते चांदणीचौक असलेला कर्वे रोड साधारण 4 किलोमीटरचा आहे. पुणे शहराला जोडणारा हा प्रमुख रस्ता असून, या रस्त्याला चांदणी चौकमार्गे येणारा पौड रस्ता एसएनडीटी येथे मिळतो. यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. वाहतूक कोंडीमुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत.

मुंढव्यातील रस्त्यांवर अपघात वाढले

मुंढवा : वातार्हर

मुंढवा, केशवनगर, बी. टी. कवडे रस्ता, घोरपडी, रामटेकडी, वैदूवाडी, साडेसतरानळी या परिसरातील सखल भागात पाणी साचल्यामुळे नागरिकांचे हाल झाले. झोपडपट्ट्यांमधील घरामध्ये पाणी शिरल्याच्या काही किरकोळ घटना घडल्या. पावसामुळे रस्ते उखडले आहेत, साचलेले पाणी काढून देण्याची तसदीसुद्धा महापालिकेने घेतली नाही, असे येथील नागरिकांनी सांगितले.मुख्य व अंतर्गत रस्त्याच्या दोन्ही बाजूचा चिखल पावसाच्या पाण्याने आणि वाहनांच्या टायरला लागून रस्त्यावर आला आहे. त्यामुळे वाहने घसरून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनेक ठिकाणी पावसाळी वाहिन्या नाहीत, त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यात साचून राहिले. तसेच, ज्या ठिकाणी पावसाळी वाहिन्या आहेत, त्या चिखल-माती व राडारोड्यामुळे चोकअप झाल्या आहेत. 

पालिकेने तातडीने उपाययोजना करावी

संततधार पावसामुळे अनेक ठिकाणचे सिग्नल नादुरुस्त झाले आहेत. त्यामुळे प्रमुख चौकात वाहतूक कोंडी होऊन दूरपर्यंत रांगा लागत आहेत. पावसामुळे वाहनांचा वेग कमी झाला आहे. रस्त्यावर पाणी व चिखल साचला आहे. त्यातच सिग्नल यंत्रणा बंद असल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पालिका प्रशासनाने उपाययोजना करणे आवश्यक आहे.

वाहतूक कोंडीनेनागरिक त्रस्त

खडकवासला गाव, धरण माथ्यावरील रस्ता यांची खड्ड्यांमुळे  चाळण झाली आहे. मोठमोठ्या खड्ड्यात पाणी साठून सर्वत्र दलदल निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पर्यटकांची वर्दळ वाढल्याने अपघात वाढले आहेत. त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. पावसाचे पाणी साठून डबकी तयार झाली आहेत. राडारोडा, कचरा आहे.   खड्ड्यात वाहने घसरून पडत आहेत. अपघात होत आहेत. अशा धोकादायक खड्ड्यातून ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे. नांदेड फाट्यावरील पुलाजवळ तसेच किरकटवाडी  फाटा, कोल्हेवाडी  ते खडकवासला गावातून जाणार्‍या रस्त्याची चाळण झाली आहे. गोर्‍हे बुद्रुक येथील रस्ता खचला असून खोल खड्ड्यात वाहने पडून अपघात होत आहेत. कोट्यवधी रुपये खर्चाचे रस्ते पहिल्याच पावसाळ्यात वाहून गेले आहेत. त्यामुळे महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचा फटका नागरिकांना बसत आहेत. खड्डे, साठलेल्या पाण्याच्या डबक्यातून मार्ग काढताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. संततधार पावसात वाहतूक कोंडी वाढली आहे.