Tue, Jul 16, 2019 00:13होमपेज › Pune › वेग आणि सेल्फीमुळे पर्यटन बेततेय जिवावर

वेग आणि सेल्फीमुळे पर्यटन बेततेय जिवावर

Published On: Aug 05 2018 1:32AM | Last Updated: Aug 05 2018 12:04AMलोणावळा : विशाल पाडाळे

गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र, गोवा असो अथवा इतर राज्यांतील पर्यटनस्थळे असो, अशा पर्यटनस्थळांवर सर्वच ऋतूंतील पर्यटनाचा निखळ व सुरक्षित आनंद लुटण्याची संस्कृती लोप पावली आहे. सध्या सर्वत्र युवकांमध्ये आणि युवतींमध्ये पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी एक नशापानाची नवी विकृती आणि सुसाट वेगात वाहने चालविण्याची जीवघेणी ‘क्रेज’ रुजू लागली आहे; तसेच धोकादायक सेल्फी घेण्याच्या मोहामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.   

मागील काही वर्षांपासून नशेची व अतिवेगाची विकृती, स्टंटगिरी ही स्वत:च्या जीवासह अनेकांच्या जीवावर बेतली आहे. याचे उदाहरण  मागील महिन्यात 15 जुलै रोजी लोणावळ्याजवळील कार्ला फाटा येथे झालेल्या दोन कारच्या भीषण अपघातात नऊ जणांचा झालेला मृत्यू.

यामध्ये एका कार चालकाच्या अतिवेगाच्या धुंदीमुळे एका कुटुंबातील चार जणांचा कोणतीही चूक नसताना नाहक जीव गेला. या घटनेत त्या कुटुंबातील तीन पिढ्या काळाच्या पडद्याआड गेल्या. ही अशा प्रकारची पहिलीच दुर्घटना नसून, यापूर्वीही अशा दुर्घटनेत अनेकांचा बळी गेला आहे. युवा मित्रांनो, वर्षाविहार असो किंवा हिवाळा, उन्हाळा पर्यटनाचा निखळ आनंद लुटताना प्रत्येकाने आपल्या अतिउत्साह, फाजील आत्मविश्वास, अतिवेग, नशापान, उसन्या अवसानांसह स्टंटगिरीला लगाम घालण्याची नितांत गरज आहे. 

‘सेल्फी’मुळे अनेकांचे बळी

सध्या लहान मुले, अबालवृद्ध आणि समस्त युवावर्गाला पर्यटनस्थळी गेल्यावर तेथील ठिकाणाची छबी, दृश्य टिपण्याची नवी क्रेज रूढ झाली आहे. आपापल्या मोबाईलव्दारे (सेल्फी) काढण्याची क्रेझ रूढ झाली आहे. फाजील आत्मविश्वास, अतिउत्साह, स्टंटगिरी करत अनेकजण अत्यंत धोकादायक ठिकाणी जावून मोबाईद्वारे सेल्फी काढतात. गड, किल्ले, उंच डोंगर, सुळके, खोल दर्‍या, धबधबे, कडेकपारी, गुहा, वेगवान जलप्रवाह, खोल जलाशये अशा विविध ठिकाणी पर्यटनाला गेल्यावर तेथील परिसरातील धोकादायक ठिकाणी सेल्फी काढण्याची क्रेज केवळ युवकांमध्येच नाही, तर सर्वांमध्ये वाढल्याचे वास्तव आहे. धोकादायक ठिकाणाच्या सेल्फीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.  

मागील काही वर्षांपासून 15 वर्षापासूनच्या मुलांसह युवक व युवतींमध्ये विविध प्रकारच्या नशापानाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हा विकृत संगतीचा परिणाम असून, युवापिढी विविध प्रकारच्या नशेच्या मोहजाळात अडकली आहे. मुलांमध्ये ड्रग्ज, दारू, चरस, गांजा, इतर अमली, पदार्थ, हुक्का आणि इतर नव्याने विकसित होणारे नवनवीन मादक पदार्थांचे व्यसन वाढले आहे. तसेच मद्यपानाच्या नशेसह अनेकांना सुसाट वेगाची नशाही लागली आहे. या रॅश (सुसाट) गाडी चालविण्याची विकृतीमुळे मागील काही वर्षात विविध महामार्ग, राष्ट्रीय मार्ग, रस्त्यांवर जीवघेण्या अपघातांचे प्रमाण वाढले असून, झालेल्या अपघातात अनेकांचे नाहक जीव गेले आहेत.

आलिशान मोटारसायकली व चारचाकी वाहनांचे प्रचंड फॅड निर्माण झाले आहे. या अलिशान गाड्या चालविण्याचा, हाताळण्याचा मोह युवकांना शांत बसून देत नाही. या गोष्टींना अनेक पालकांचा लाड व पालकांचे मुलांकडे होणारे दुर्लक्ष कारणीभूत आहे. आलिशान बाईक आणि कार चालविताना तरुणांना वेगमर्यादेचे भान राहत नाही. अनेकजण नशेत सुसाट गाडी चालवीत वेगाच्या सीमाच ओलांडत असतात. काहीजण आपल्या सुसाट वेगाची छबी मोबाईल मध्ये टिपत वाहने जोरात दामटतात, वाहतूक नियम आणि वेग मर्यादेचे भान ठेवत नाहीत. 

या ठिकाणी येणार्‍यांत विशेषतः पुणे, ठाणे, मुंबई परिसरातील विविध महाविद्यालयाच्या युवक, युवतींचे प्रमाण अधिक असते. रात्री सात व मध्यरात्री 12 नंतर हा युवा वर्ग समुहाने आलिशान गाड्यांतून येतात. याठिकाणी आजू बाजूला झाडीत, माळावर, कारमध्ये संगीताच्या तालावर ठेका धरत नाचत, खिदळत रात्रभर नशा करून पुन्हा पहाटे व सकाळी परतीचा मार्ग धरतात.

अनेकवेळा जाता, येताना नशा आणि रात्रीच्या जागरणामुळे अपघात झाले आहे. आतापर्यंत झालेल्या अनेक अपघातात अनेकांचे जीव गेले आहे. तर अनेकजण गंभीर जखमी होऊन जायबंदी झाले आहेत. दारु आणि वेगाच्या नशेमुळे होणार्‍या अपघातांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. ही बाब खेदजनक असून, कुटुंब आणि समाजाला दूरगामी विचार करायला लावणारी आहे. कमी वयात हातात येणारा पैसा. त्याच्या विनियोगाकडे पालकांचे होणारे दुर्लक्ष कारणीभूत आहे. या विकृतींना लगाम कोण घालणार, याचा विचार करायला लावणारा आहे.