Wed, May 22, 2019 22:19होमपेज › Pune › तोरणावर जुनी तटबंदी आढळली

तोरणावर जुनी तटबंदी आढळली

Published On: Dec 18 2017 2:41AM | Last Updated: Dec 18 2017 12:38AM

बुकमार्क करा

खडकवासला : दत्तात्रय नलावडे

छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रतिकूल परिस्थितीत मूठभर निधड्या छातीच्या मावळ्यांसह  हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेल्या वेल्हे तालुक्यातील अतिदुर्गम व सर्वात अधिक उंचीच्या तोरणागडावर साडेतीनशे वर्षांपूर्वीची शिवकालीन अभेद्य तटबंदी सापडली आहे. छत्रपती शिवरायांचे जागतिक किर्तीचे लष्करी सामर्थ्य तसेच गडकोटांच्या सुरक्षा व्यवस्थेचा जिवंत वारसा या अभेद्य शिवकालीन तटबंदीमुळे उजेडात आला आहे. याच वर्षी मार्च महिन्यात तोरणागडाशेजारील हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या किल्ले राजगडावर बुरुज, तटबंदीची दुरूस्ती करताना साडेतीनशे वर्षांपूर्वीची जमिनीत गाडलेली शिवकालीन तटबंदी सापडली. तशीच अभेद्य शिवकालीन तटबंदी तोरणागडाच्या शिवकालीन मेंगाईदेवी मंदिराजवळ असलेल्या बुरुजांच्या कोसळलेल्या भिंतीवर सापडली आहे. 

कोकण दरवाजापासून झुंझार माचीपर्यंत तटबंदी आहे. शेकडो वर्षांपासून दगड-मातीत शिवकालीन तटबंदी गाडली होती. राज्य सरकारच्या पुरातत्त्व खात्याच्या वतीने गडावर सध्या डागडुजीची कामे सुरू आहेत. तटबंदी, बुरुजांच्या दुरुस्तीसाठी खोदकाम करताना जमिनीत गाडलेल्या शिवकालीन तटबंदीचे अवशेष दिसले. त्यानंतर गाडलेल्या तटबंदीवरील माती, दगड, राडारोडा बाहेर काढण्यात आला. त्यावेळी जमिनीत गाडलेल्या शिवकालीन अभेद्य दगडी चिरेबंदी तटबंदीचे दर्शन झाले. तटबंदीची रुंदी जवळपास सहा फूट इतकी असून, गडाच्या दोन  बुरुजांच्या मध्यभागी तटबंदी आहे. गडाच्या संरक्षणासाठी तटबंदीची रचना अतिशय कल्पकतेने केली आहे. तटबंदीत गस्ती मार्गे तसेच सुरक्षारक्षक, पहारेकरी, मावळ्यांना व सैन्याला लपून बसण्यासाठी ठिकठिकाणी जागा आहेत. 
शत्रूवर नजर ठेवण्यासाठी तटबंदीत गुप्त जागा आहेत. छत्रपती शिवरायांच्या जागतिक किर्तीच्या लष्करी सामर्थ्याचे, तसेच उत्कृष्ट स्थापत्य कलेचे दर्शन घडविणारी अतिदुर्गम तोरणागडाची तटबंदी राजगडाच्या तटबंदीप्रमाणे शेकडो वर्षांच्या काळाच्या ओघात लुप्त झाली होती.