Tue, Apr 23, 2019 14:24होमपेज › Pune › तोरण्याला पुन्हा शिवकालीन वैभवाचा साज

तोरण्याला पुन्हा शिवकालीन वैभवाचा साज

Published On: Apr 10 2018 1:14AM | Last Updated: Apr 10 2018 12:03AMखडकवासला : दत्तात्रय नलावडे  

छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेल्या व शिवरायांच्या विश्ववंदनिय लोककल्याणकारी कार्याचा वारसा असलेल्या अति दुर्गम व राज्यातील सर्वात उंच तोरणागडावर पुन्हा उभा राहत आहे छत्रपती शिवरायांचा अनमोल ठेवा. शेकडो वर्षांच्या काळाच्या ओघात लुप्त झालेल्या तोरणागडावरील ऐतिहासिक  भग्न वास्तु तसेच तटबंदी, बुरूज, तळी नव्या दिमाखात उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे गडावर  शिवकालीन वैभव उभे राहत आहे.  साडेतीनशे वर्षांनंतर प्रथमच गडाच्या डागडूजीची कामे करण्यात आल्याने उन्मळलेल्या  तटबंदी, बुरूजांमध्ये शिवकालीन वैभवाची साक्ष देणारे बांधकामाचे अवशेष सापडले.    

राज्य सरकारच्या पुरातत्व खात्याच्या वतीने गडाच्या उंच डोंगर कपारयावरील तब्बल  दिड हजार मीटर अंतराच्या तटबंदीची डागडूजी करण्यात आली आहे. गडाच्या अति बिकट कोकण दरवाज्यापासून बिन्नी दरवाज्या पर्यंतच्या तटबंदीची डागडूजी करण्यात आली आहे.  या शिवाय तटबंदीतील अत्यंत बिकट बुरूजांची तसेच शिवकालीन भग्न इमारतींची डागडूजी, पाण्याच्या टाक्या, तळ्यांची स्वच्छता, डागडूजी, ये जा करणार्‍या मार्गावर लोंखडी सुरक्षा रेलिंग आदी कामे केली जात आहे. स्थानिक तसेच परप्रांतीय पन्नासहून अधिक मजूर कडक उन्हात काम करत आहेत. बांधकामासाठी लागणारा दगड, वाळू, सिमेंट, पत्रा, लोंखड आदी बांधकाम साहित्य गडाच्या पुर्वेस असलेल्या मेटपिलावरे मार्गाने क्रेनच्या साहाय्याने गडाच्या चढवले जात आहे. 

गडावर एकट्या माणसाला पायी चालताना मोठ्या बिकट प्रसंगाना सामोरे जावे लागते अशा बिकट व अति दुर्गम तोरणागडावर हर हर महादेव , जय शिवराय च्या जयघोषात काबाडकष्टाची कामे स्थानिक मावळे मजूर तसेच इतर करत आहेत. गेल्या वर्षी डागडूजीची कामे सुरू झाली. जवळपास दोन वर्षांपासून कामे सुरू आहेत. पावसाळा सुरू होण्याआधी सर्व नियोजित कामे पूर्ण केली जाणार आहेत.     

पुरातत्व खात्याचे पुणे विभागाचे सहसंचालक विलास वाहने म्हणाले, तोरणागडाच्या डागडूजीच्या कामासाठी  दोन ते अडीच कोटी रुपयांचा निधी खर्च होणार आहे. या पैकी 1 कोटी 66 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पावसाळ्यात गडावर जोरदार पाऊस व वारा असल्याने पावसाळ्यात कामे करता येत नाही. त्यामुळे पावसाळ्या पुर्वी कामे केली जाणार आहेत. सह्याद्रीच्या उंच डोंगर रांगात अति दुर्गम ठिकाणी गड आहे . गडावर ये जा करणारे पायी मार्ग बिकट कडे कपार्‍यात आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी अशा मार्गावर लोंखडी सुरक्षा रेलींग बसविण्यात येत आहे. शिवभक्त, पर्यटकांना मुबलक प्रमाणात स्वच्छ पाणी मिळावे यासाठी गडावरील शिवकालीन  टाक्या, तळ्यातील गाळ काढून डागडूजी करण्यात आली आहे. 

शिवकाळा नंतर प्रथमच तोरणागडावर मोठ्या प्रमाणात डागडूजी ची कामे करण्यात येत आहे. अति दुर्गम व अति उंच तसेच आकाराने अति विशाल असलेल्या तोरणागडाचे शिवकालीन नाव प्रचंडगड असे आहे. छत्रपती शिवरायांनी हिदंवी स्वराज्याची स्थापना करून तोरण उभारले  त्यामुळे  तोरणागड या नावाने गडाची ओळख आहे. गडाच्या डागडूजी करताना शिवरायांना अनमोल खजिना सापडला. गडावरील शिवकालीन श्री मेंगाईदेवी व इतर देवतांच्या भग्न मंदिराचा जिर्णोध्दार केला. गडाच्या  सुरक्षिततेसाठी छत्रपती शिवरायांनी अभेद तटबंदी ,बुरूजांची तसेच दरवाजे ,मार्गाची रचना आपल्या कल्पकतेने केली. राजगड प्रमाणेच छत्रपती शिवरायांच्या उत्कृष्ट स्थापत्य कल्पकतेचा जिवंत वारसा तोरणागडावरील डागडूजी च्या कामातून पुन्हा जिवंत झाला आहे. 

चौथार्‍याचीही डागडुजी 

शिवकालीन भग्न अवस्थेत असलेल्या  इमारतींची डागडूजी करण्यात येत आहे. या ठिकाणी केवळ चौथरेच तसेच अर्धवट पडक्या भिती होत्या. याची डागडूजी करून लोंखडी पत्र्याचे छप्परे  बसविण्यात आली आहेत. दरवाजे व खिडक्या बसविण्यात येणार आहेत. अति दुर्गम तोरणागडावर डागडूजीची कामे करण्याचे मोठे आवाहन आहे. पुरातत्व खात्याकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. असे असताना पुरातत्व खात्याचे तोरणागडाचे पाहरेकरी बापु साबळे यांनी छत्रपती शिवरायांवरील निस्सिम भक्तीपोटी या कामासाठी स्वतःला झोकून दिले आहे.