Fri, Jul 19, 2019 05:10होमपेज › Pune › राज्यभरात टोमॅटोचे दर गडगडले

राज्यभरात टोमॅटोचे दर गडगडले

Published On: Aug 29 2018 1:43AM | Last Updated: Aug 29 2018 1:14AMपुणे : प्रतिनिधी

राज्यातील स्थानिक बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात टोमॅटो दाखल होत आहे. त्यामुळे गुलटेकडी मार्केट यार्डमधील मालाला स्थानिक व्यापार्‍यांकडून मागणी घटली. परिणामी महिन्याभरातील दराच्या तेजीनंतर टोमॅटोचे दर पुन्हा गडगडले आहेत. मंगळवारी बाजारात साडेतीन हजार ते चार हजार पेटींची आवक झाली. त्याच्या प्रति किलोस अवघा 5 ते 7 रुपये भाव मिळाला. त्यामुळे बळीराजा हतबल आहे.

सद्यस्थितीत बाजारात जिल्ह्यातील केळावडेसह सोलापूर, सातारा, संगमनेर, कराड येथून टोमॅटो दाखल होत आहेत. इतर दिवसांच्या तुलनेत ही आवक कमी आहे. शहरातील मार्केटयार्डातून राज्यातील कोकण तसेच शहरातील उपनगरांसह जिल्ह्याच्या विविध भागात हा माल विक्रीसाठी पाठविण्यात येतो. मात्र, ज्या ठिकाणी हा माल पाठवला जातो त्या स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांकडून टोमॅटोची आवक होत आहे. परिणामी, तेथूनही मागणी होत नसल्याने दरात कमालीची घट झाली आहे. साधारण एक महिन्यापूर्वी 8 ते 10 रुपये प्रतिकिलो असणारा टोमॅटो घाऊक बाजारात 5 ते 7 रुपयांपर्यंत घसरला आहे.

मोठ्या प्रमाणात लागवड 

यावर्षी मोठ्या प्रमाणात टोमॅटोेच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली. गतवर्षी मका पिकाला भाव नसल्याने मका पिकाला कंटाळून शेतकर्‍यांनी यंदा टोमॅटोे पिकाची वाट धरली. पण आता या पिकानेही दगा दिल्याने शेतीत उत्पादन करावे तरी काय, असा प्रश्‍न येवला तालुक्यातील (जि. नाशिक) नवनाथ पगार या शेतकर्‍याने उपस्थित केला.

एका क्रेटस्ला 60 रुपयांचा भाव

मनमाड बाजार समितीत कांदा पाठोपाठ टोमॅटोही घसरला आहे. त्यामुळे शेतकरी अक्षरश: हतबल झाल्याचे चित्र आहे. येथे एका क्रेटस्ला 60 रुपयांचा भाव मिळाला.  

बाजारात टोमॅटोच्या 20 ते 22 किलोच्या प्रतिक्रेटला 100 ते 150 रुपये दर मिळत आहे. एका एकराला जवळपास दीड ते दोन लाख रुपये खर्च येतो. मात्र, दरात  घसरण झाल्याने हातात येत असलेल्या पैशांमधून फक्त तोडणी व वाहतूक खर्च निघत आहे.     - माणिकराव बांगर, शेतकरी, शिरूर

बाजारात दररोज 80 ते 100 कॅरेट टोमॅटो विक्रीसाठी आणण्यात येत आहे. त्याच्या प्रतिकिलोस तीन ते सहा रुपये दर मिळत आहे.  दर सातत्याने कोसळत असल्याने टोमॅटोचे पीकातून फायद्यापेक्षा नुकसान अधिक होत आहे.  - अमोल जाधव, शेतकरी, गणेगाव, शिक्रापूर