Tue, Jul 23, 2019 16:52होमपेज › Pune › पेट्रोल पंपांवरील शौचालये सार्वजनिक

पेट्रोल पंपांवरील शौचालये सार्वजनिक

Published On: Feb 23 2018 1:24AM | Last Updated: Feb 22 2018 10:52PMराजगुरूनगर : वार्ताहर 

स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत पेट्रोलपंप व्यावसायिकांनी पेट्रोलपंपांच्या आवारात सार्वजनिक शौचालय सुविधा देणे अनिवार्य करण्यात आले आहे. दरम्यान, चाकण नगरपरिषद हद्दीतील सर्व पेट्रोल पंपांवर असलेल्या शौचालयांचा सार्वजनिक शौचालये म्हणून वापर करण्यात येणार असल्याची घोषणा एका अधिसूचनेद्वारे चाकण नगरपरिषदेकडून करण्यात आली आहे. 

स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार नागरिकांना शौचालयाची सुविधा उपलब्ध होण्याकरिता सर्व पेट्रोलपंपांवरील शौचालयांना सार्वजनिक शौचालये म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. त्यानुसार चाकण पालिकेमार्फत सर्व पेट्रोलपंप व्यावसायिकांना पेट्रोल पंपाच्या आवारात असलेल्या शौचालयांना सार्वजनिक शौचालय म्हणून घोषित करण्यासाठी, तसेच पेट्रोल पंपांच्या आवारात त्याबाबतचे दिशादर्शक फलक लावण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. 

दरम्यान, या सुविधेचा वापर करण्याचे आवाहन चाकण पालिकेतर्फे नागरिकांना करण्यात आले आहे. स्वच्छ भारत अभियानामध्ये चाकण शहराच्या सर्वेक्षणाची मोहीम सुरू आहे.

या अनुषंगाने महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम 1965 च्या तरतुदीनुसार शहरातील सर्व पेट्रोल पंपांवरील शौचालये सामान्य लोकांच्या वापरांसाठी खुली करण्यात आली असल्याचे चाकण पालिका प्रशासनाकडून एका अधिसुचनेद्वारे घोषित करण्यात आले आहे. 

सुविधांचा वापर करण्याचे आवाहन

शहरातील सर्व पेट्रोलपंपांवरील शौचालये सर्वसामान्य नागरिकांना खुली करण्याबाबत गृहनिर्माण व नागरी कार्य मंत्रालय, भारत सरकारमार्फत देशभर स्वच्छ भारत अभियान व स्वच्छ सर्वेक्षण-2018 अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाच्या यशस्वितेसाठी पेट्रोलियम मंत्रालय, भारत सरकार यांनी देशातील सर्व पेट्रोलपंपांवरील शौचालये सामान्य नागरिकांच्या वापरासाठी खुली करण्याचे आदेश दिले आहेत. त्याअनुषंगाने या कार्यालयाकडून यापूर्वीदेखील सर्व पेट्रोलपंपधारकांना सूचित करण्यात आलेले आहे. त्यामुळे याबाबत चाकण नगरपरिषदेकडून अधिसूचनेद्वारे पुन्हा सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, चाकण शहरातील सर्व पेट्रोलपंपांवरील शौचालये सर्व नागरिकांना वापरासाठी उपलब्ध असून, नागरिकांनी त्याचा वापर करावा.  - अशोक साबळे, मुख्याधिकारी, चाकण नगरपालिका