Thu, Apr 25, 2019 15:52होमपेज › Pune › आदिवासींसाठी शौचालयांची योजना

आदिवासींसाठी शौचालयांची योजना

Published On: Jan 16 2018 2:15AM | Last Updated: Jan 16 2018 12:47AM

बुकमार्क करा
पुणे : 

रानावनात भटकंती करणारे, आरोग्य, शिक्षण याबाबत अनभिज्ञ.. डोंगराळ भागात राहणारे... मुख्य प्रवाहापासून दूर असणारे... इतकी वर्षे उघड्यावरच शौचाला जाणारे पालघर जिल्ह्यातील आदिवासी नागरिकही आता टॉयलेटमध्ये जाणार आहेत.

पुण्यातील फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने मुंबईतील खेरवाडी सोशल वेल्फेअर असोसिएशनच्या सहकार्याने पालघर जिल्ह्यातील सोनाळे या आदिवासी गावात 50 अत्याधुनिक शौचालये बांधली असून, त्यावर सौर दिवेही बसविले आहेत. त्यासाठी सुमारे 10 लाख रुपयांचे अर्थसहाय्य केले आहे. सोनाळे गावात एकूण 123 घरे असून, त्यातील 50 घरांना पहिल्या टप्प्यात शौचालये बांधून देण्यात आली आहेत. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन नुकतेच झाले. 

याप्रसंगी समाज कल्याण विभाग वाडाचे अध्यक्ष सोन्या पाटील, प्रशासकीय अधिकारी संदीप जाधव, खोसे, सोनाळे गावच्या सरपंच अरुणा गुरुडे, उपसरपंच पंढरीनाथ मरड, फिनोलेक्सचे बी. आर. मेहता, मुकुल माधव फाउंडेशनचे जितेंद्र जाधव, बबलू मोकळे यांच्यासह इतर मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. 

मुकुल माधव फाउंडेशनने सोनाळे गाव दत्तक घेतले असून, चार टप्प्यात हा प्रकल्प राबविला जाणार आहे. उर्वरित 73 शौचालये दुसर्‍या टप्प्यात ग्रामस्थांच्या संमतीनंतर बांधली जातील. तिसर्‍या टप्प्यात ग्रामपंचायतीच्या संमतीने सौर पथदिवे बसविले जाणार आहेत. तर चौथ्या टप्प्यात आरोग्याविषयी जागृती कार्यक्रम आणि आरोग्य शिबिरे घेतली जाणार आहेत. यासाठी प्रति शौचालय 24 हजार रुपये आणि सौर दिव्यासाठी 1150 रुपये असा एकूण 25 हजार 150 रुपये खर्च आला आहे. त्यातील दोन हजार रुपये (शौचालयाचे), तर 50 रुपये (सौर दिव्याचे) नागरिकांनी भरले आहेत. उर्वरित खर्च फाऊंडेशनने उचलला आहे. 

फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय संचालक रितू छाब्रिया म्हणाल्या, उघड्यावरील शौचामुळे होणारे आजार आम्ही गावकर्‍यांना सांगितले. मुली आणि महिलांना खासगी आणि सुरक्षित आयुष्याबाबत जागृत करण्यासाठी फाउंडेशन प्रयत्नशील आहे.