Tue, Oct 22, 2019 01:30होमपेज › Pune › स्वच्छतागृह बनले कागदपत्रांचे गोदाम

स्वच्छतागृह बनले कागदपत्रांचे गोदाम

Published On: Jan 28 2018 1:37AM | Last Updated: Jan 28 2018 1:05AMपुणे : प्रतिनिधी

साखर संकुलामधील पहिल्या मजल्यावर असणार्‍या पुणे प्रादेशिक साखर सह संचालक कार्यालयाची दुरवस्था झाली असून, जुने दस्तऐवज अगदी स्वच्छतागृहात ठेवण्यात आलेले आहेत. कर्मचार्‍यांना बसण्यास असलेल्या अपुर्‍या जागेसह अंधुक प्रकाश, हवा न येण्यामुळेही त्रास कायम आहे. कामानिमित्त अथवा सुनावणीसाठी आलेल्या कारखाने, शेतकर्‍यांच्या प्रतिनिधींना बसण्यासही जागा नसल्यामुळे अडचणीत भर पडलेली असून, साखर आयुक्तालय या प्रश्‍नांकडे कधी लक्ष देणार, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

राज्यात सद्य:स्थितीत 180हून अधिक साखर कारखाने सुरू आहेत. त्यापैकी पुणे प्रादेशिक साखर सह संचालक कार्यालयाच्या नियंत्रणाखाली प्रामुख्याने पुणे जिल्हा 17, सातारा 14 आणि सोलापुरातील 36 मिळून एकूण 67 कारखान्यांचा समावेश आहे. राज्यातील एकूण ऊस गाळपापैकी सुमारे 40 टक्के ऊस आणि साखर उत्पादन या विभागात होते. कार्यालयातील जुन्या रेकॉर्डनी अक्षरक्षः स्वच्छतागृह भरून गेलेले आहे. त्याच ठिकाणी सर्व फाईल्सचे ढीग पडल्याचे दिसून आले. राज्य सहकार विकास महामंडळाचा हॉल मिळण्याची मागणीही प्रलंबित आहे. तसेच तळमजल्यावर असलेल्या दोन्ही विशेष लेखापरीक्षकांनी पहिल्या मजल्यावर येण्यास संमती दिलेली असूनही निर्णय प्रलंबितच आहे. 

याबाबत साखर संचालक (प्रशासन) डॉ. किशोर तोष्णीवाल म्हणाले, साखर संकुलमध्ये जास्तीची जागा उपलब्ध नाही. पुणे प्रादेशिक साखर सह संचालक कार्यालयास अपेक्षित असणारी जागा दिलेली आहे. काम वाढले असून, रेकॉर्डही वाढलेले आहे.