होमपेज › Pune › आजचा तरुण देशाचे उज्ज्वल भविष्य

आजचा तरुण देशाचे उज्ज्वल भविष्य

Published On: Jul 17 2018 1:36AM | Last Updated: Jul 17 2018 1:19AMपुणे : प्रतिनिधी

आजचा तरुण हे देशाचे उज्ज्वल भविष्य असून, देशासाठी तो चांगले योगदान देऊ शकतो. कमी कालावधीत विधी महाविद्यालयाची उभारणी करणे हे काम कौतुकास पात्र आहे. मुलांचा सर्वांगीण विकास होण्यावर भर दिला जाईल. सुरुवातीला 60 मुले याठिकाणी प्रशिक्षण घेतील आणि तीन टप्प्यात नवीन इमारत, क्रीडा सुविधा यांची उभारणी करण्यात येईल. बीबीएसह एलएल.बी. एकत्रित होणे आज काळाची गरज आहे. कॉर्पोरेट पद्धत वाढत असून, त्यादृष्टीने आपणास विकसित व्हावे लागेल, अशा भावना लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल डी. आर. सोनी यांनी सोमवारी व्यक्त केल्या. 
सैनिक कल्याण उपक्रमाअंतर्गत कान्हे येथे आर्मी लॉ कॉलेजचे भरपावसात सोमवारी उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. राधा कालियनदास दर्यानानी चॅरिटेबल ट्रस्टने सदर विधी महाविद्यालयाकरिता तब्बल पाच एकर जागा प्रदान केली आहे. या वेळी राधा कालियनदास दर्यानानी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रेम दर्यानानी,  मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायायाधीश डी. जी. कर्णिक, लेफ्टनंट जनरल मनोज पांडे आदी उपस्थित होते. 

दर्यानानी म्हणाले की, ‘सैन्य दलास उपयुक्त ठरेल अशाप्रकारे पायाभूत सुविधांची उभारणी करण्यासाठी आर्मी लॉ कॉलेजकरिता पाच एकर  जागा देण्यात आली आहे. केवळ पाच महिन्यांत या महाविद्यालयाची दर्जेदार उभारणी करण्यात आली असून, इतक्या कमी कालावधीत महाविद्यालयाची उभारणी करणे आव्हानच होते. परंतु लष्कराने नियोजनबद्ध पद्धतीने कमी वेळेत काम पूर्णत्वास नेले,’ असेही ते म्हणाले. 

इतिहासातील सर्वात मोठी देणगी

देशाच्या संरक्षण सेवेसाठी राधा कालियनदास दर्यानानी चॅरिटेबल ट्रस्टचे पुणेकर असलेले सवसर्वा प्रेमजी दर्यानानी यांनी पुणे-मुंबई हमरस्त्यावर कान्हे फाटा येथे सहा एकर जमीन व एकूण 12 इमारती सैन्याच्या विधी (लॉ) कॉलेजसाठी दान दिली आहे. देशाच्या इतिहासात संरक्षण सेवेकरिता एका भारतीयाची ही सर्वात मोठी देणगी आहे.  यासंदर्भात ‘पुढारी’शी डॉ. प्रेम दर्याणानी म्हणाले की, माझे आई-वडील देशाच्या प्रगतीसाठी  प्रत्येक कामामध्ये मदत करत आले आहेत. आपल्या देशात संरक्षण व्यवस्थेमध्ये विधी (कायदा)  शिक्षणासाठी कोणतेही महाविद्यालय नाही. हाच दुवा पकडून आम्ही आमच्या मालकीची 6 एकर जमीन व त्यावर 12 इमारती बांधून, संरक्षण खात्यातील देशातले पहिले विधी महाविद्यालय सुरू करण्याचा संकल्प केला व तो तडीस नेला.  सैन्याचे हे विधी महाविद्यालय सावित्रीबाई फुले विद्यापीठाला संलग्न असणार आहे व याला राज्य सरकार व बार कौन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिली आहे. 2018-19 च्या अभ्यासक्रमासाठी सैन्यातील सेवेत असलेल्या व निवृत्त झालेल्या जवानांच्या 60 पालकांना प्रवेश दिला जाणार आहे. 5 वर्षांचा बी.बी. ए. एलएल. बी.चा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे व त्याची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.