Tue, Mar 26, 2019 21:52होमपेज › Pune › तुकोबाच्या पालखीचे आज देहूतून प्रस्थान  

तुकोबाच्या पालखीचे आज देहूतून प्रस्थान  

Published On: Jul 05 2018 1:40AM | Last Updated: Jul 05 2018 12:46AMपुणे : उमेश ओव्हाळ  

देहूरोड आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराजांचा 333वा पालखी सोहळा गुरुवारी दुपारी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या सोहळ्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केल्याचा दावा केला आहे. ग्रामपंचायत, जिल्हा महसूल विभाग, पोलिस प्रशासन अशा विविध यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.

संपत्ती सोहळा नावडे मनाला । लागला टकळा पंढरीचा ॥ आषाढी वारीसाठी संतजन व्याकुळ झाले आहेत.  पंढरीच्या विठुरायाची ओढ त्यांना लागली आहे.  या ओढीनेच लाखो भाविक संतांच्या पालखीत सहभागी होऊन ऐसा सांडुनि सोहळा । मी का पडेन निराळा ॥ हा भक्तिभाव मनाशी घेऊन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी देहूत दाखल झाले आहेत.  प्रस्थानाच्या मुख्य सोहळ्याला दुपारी अडीच वाजता सुरुवात होणार आहे.  जगद‍्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थानने सोहळ्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे.  मानाच्या दिंड्या,  फडकरी,  सेवेकरी,  चोपदार मंडळी देहूत दाखल झाले आहेत.  बाभुळगावकरांचे मानाचे अश्‍व दाखल झाले आहेत.  परंपरेप्रमाणे महाराजांच्या पादुका पॉलिशसाठी गावातील घोडेकर सराफ यांच्या घरी दाखल झाल्या आहेत.  संस्थानच्या वतीने मंदिर परिसरात 34 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.  प्रदक्षिणा मार्गावर रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे.  दर्शनबारी साफसफाई करण्यात आली आहे.  दक्षिण दरवाजाकडील नवीन रस्ता खुला करण्यात आला आहे.     

पोलिस यंत्रणा सज्ज

सोहळ्यात सर्व प्रकारच्या सुरक्षेसाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे.  एक उपविभागीय पोलिस अधिकारी,  सात पोलिस निरीक्षक,  19 सहाय्यक/ उपनिरीक्षक,  130 कर्मचारी,  75 महिला पोलिस,  70 वाहतूक पोलिस,  राज्य राखीव पोलिस दलाची एक प्लाटून,  आरसीएफचे एक पथक,  तसेच चार सशस्त्र जवान या सोहळ्यात बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.  

आरोग्य विभागाची तयारी

जिल्हा आरोग्य विभागाने यात्रेकरूंच्या सेवेसाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात बाह्यरुग्ण आणि आंतररुग्ण सेवा चोवीस तास सुरू राहणार आहे.  विविध लसी, सर्पदंशावरील लस आदी पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत.  रुग्णांना तातडीच्या गरजेसाठी सुमारे पाच रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.  

ग्रामपंचायतीकडून सर्व कामे पूर्ण

देहू ग्रामपंचायतीकडून गावातील स्वच्छतेकडे मुख्यत्वे लक्ष दिले जाते.  सर्व रस्ते,  इंद्रायणीचे दोन्ही घाट चकाचक करण्यात आले आहेत.  निर्मलवारी संकल्पनेंतर्गत गावात मोक्याच्या ठिकाणी 500 तात्पुरती शौचालये उभारण्यात आली आहेत. गावातील हॉटेल्स,  उपाहारगृहे आणि चहा-वडापाव विक्रेत्यांना स्वच्छता आणि शुध्द वस्तू वापराच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून यात्राकाळात चोवीस तास पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात येणार आहे.