होमपेज › Pune › समान पाणी योजनेच्या निविदांसाठी आजची मुदत 

समान पाणी योजनेच्या निविदांसाठी आजची मुदत 

Published On: Jan 22 2018 1:23AM | Last Updated: Jan 22 2018 1:05AMपुणे : प्रतिनिधी

महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी समान पाणीपुरवठा योजनेसाठी निविदा भरण्याची सोमवारी अंतिम मुदत आहे. या निविदांना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने तब्बल तीन वेळा प्रशासनाने मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता सोमवारची अखेरची मुदतवाढ संपल्यानंतर  निविदा उघडण्याची प्रक्रिया सुरू होईल, असे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

समान पाणी योजनेसाठी प्रशासनाने शहराचे एकूण सहा झोन केले आहेत. त्यामधील झोन क्र. सहा वगळता एकाही झोनच्या निविदांना अपेक्षित असा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे प्रशासनाने याआधी 5 जानेवारी, त्यानंतर 15 जानेवारी आणि आता 22 जानेवारी अशी तीन वेळा फेरनिविदांसाठी मुदतवाढ दिली होती. त्यामुळे आता सोमवारी अखेरची मुदत असणार असून त्यानंतर या निविदा उघडण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.  

निविदांमध्ये ठेकेदार कंपन्यांची पात्रता तपासण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे पाकीट ‘अ’मध्ये असतात. या योजनेच्या सल्लागाराकडून हे पाकीट उघडण्यात येणार आहे, त्यानंतर कंपन्यांच्या पात्रतेबाबतचा अहवाल तांत्रिक छाननी समितीसमोर सादर करण्यात येणार आहे. ठेकेदाराचा अहवाल आणि कंपन्यांच्या पात्रतेनुसार छाननी समितीने या निविदांना मंजुरी दिल्यास पाकीट ‘ब’ उघडण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यातून निविदा वाढीव दराने आल्या आहेत की कमी हे स्पष्ट होऊ शकणार आहे. 

दरम्यान छाननीत काही कंपन्या अपात्र ठरल्या तर, फेरनिविदा काढायची की पुरेशी संधी दिल्यानंतरही कंपन्यांकडून प्रतिसाद न मिळाल्याने आहे त्या कंपन्यांच्या निविदा उघडून कमी दराच्या निविदा मान्य करायच्या, याचा निर्णय महापालिका प्रशासनाला घ्यावा लागणार आहे.

कंपन्या अपात्र ठरण्याची शक्यता

समान पाणी योजनेसाठी ज्या काही कंपन्यांनी निविदा भरल्या आहेत; मात्र त्यामधील काही कंपन्यांना अन्य महापालिकांमध्ये अपात्र करण्यात आल्याचे आरोप विरोधी पक्षाकडून करण्यात आले आहेत. त्यामुळे या कंपन्या अपात्र ठरण्याची शक्यता असून, त्यामुळे काही झोनमध्ये दोनच कंपन्यांमध्ये स्पर्धा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.