Sat, Jul 20, 2019 08:38होमपेज › Pune › धर्मादाय घेणार सामूहिक विवाहासाठी पुढाकार

धर्मादाय घेणार सामूहिक विवाहासाठी पुढाकार

Published On: Feb 25 2018 1:16AM | Last Updated: Feb 25 2018 1:01AMपुणे : प्रतिनिधी

राज्यात ग्रामीण भागांत मुलींच्या लग्‍नासाठी शेतकरी खाजगी सावकाराकडून भरमसाठ दराने  (वर्षाला 40 टक्के) कर्ज काढतात. या भल्यामोठया व्याजाच्या दबावाखाली दबून अनेक कुटुंबे कर्जाच्या खाईत ढकलले जातात आणि त्यामुळे शेतकरी आत्महत्या करतात. या शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी राज्याचा धर्मादाय विभाग सरसावला आहे.

शेतकर्‍यांना मुलींच्या लग्‍नासाठी कर्ज काढावे लागू नये त्यासाठी सामूहिक विवाहसोहळे आयोजित करण्यासाठी आपापल्या परिसरातील धर्मादाय न्यास, एनजीओ, संस्था यांनी पुढाकार घ्यावा.  ज्या संस्थांकडे 20 लाख रुपयांपेक्षा अधिक निधी शिल्‍लक असेल त्या संस्थांनी हा उपक्रम त्यांच्या परिसरातील शेतक-यांसाठी राबवावा असे अवाहन धर्मादाय आयुक्‍त शिवकुमार डिगे यांनी संस्थांना केले आहे.

धर्मादाय संस्थांचा उद्देश हा समाजतील दारिद्र, दैन्य दुर करणे तसेच वंचित घटकांचे राहणीमान उंचावणे हे आहे. राज्यात जवळपास आठ लाख संस्था आहेत. त्यांनी जर असे समाजपयोगी उपक्रम हाती घेतले तर समाजातील अनेक समस्या नाहीशा होतील, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.  यासाठी राज्यातील आठ ते नऊ सह धर्मादाय आयुक्‍त कार्यालयांमध्ये बैठका घेण्यात येणार आहेत.