Sun, Jul 21, 2019 07:58होमपेज › Pune › सार्वजनिक वाटप व्यवस्थेला ‘आधार’चा ‘आधार’

सार्वजनिक वाटप व्यवस्थेला ‘आधार’चा ‘आधार’

Published On: Feb 15 2018 1:57AM | Last Updated: Feb 15 2018 1:10AMपुणे : दिगंबर दराडे

रेशन दुकानदारांना धान्याची उचल करणे सुलभ व्हावे, गळती रोखावी, याच बरोबर हक्‍काचे अन्न योग्य त्याच व्यक्‍तीला मिळावे, याकरिता अन्न नागरी पुरवठा विभागाने महत्त्वाकांक्षी पावले उचलली आहेत. लाभार्थ्यांना धान्य मिळण्यासाठी आता ‘आधार व्हेरिफेकशन’ करावे लागणार आहे. 

आधार सार्वजनिक वितरण सक्षम प्रणाली (एईपीडीएस) सुरु करण्यासाठी राज्यशासनाने पावले उचलली आहेत. अन्नधान्य वितरण अधिकारी पुणे क्षेत्रातील परिमंडळ ई व ग विभागाध्ये प्रायोगिकतत्वावर ही प्रणाली सुरु करण्यात आली आहे. उर्वरित परिमंडळामध्ये एक मार्चपासून ही प्रणाली सुरु करण्यात येणार असल्याची माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी रघुनाथ पोटे यांनी ‘पुढारी’शी बोलताना दिली. जानेवारी 2018 अखेर ई पॉस मशीनदवारे 2 लाख 13 हजार 392 इतक्या पात्र शिधापत्रिकाधारकांना धान्यांचे वाटप करण्यात आले आहे.

यामध्ये 1 लाख 34 हजार 94 इतक्या लाभार्थ्यांचे आधार व्हेरिफेकशन झाले आहे. वयस्कर व्यक्‍तीऐवजी त्या कुंटुबातील अन्य सदस्यांचाच अंगठा आधार पडताळणीसाठी वापरण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या प्रकियेमुळे  रेशन दुकानदारांच्या तालुका कार्यालयातील फेर्‍या कमी होणार असून, वेळ व पैशांची बचत होण्यास मदत होणार आहे. तसेच या सुविधेमुळे संपूर्ण प्रक्रिया रोखरहित होणार असून, मानवी हस्तक्षेप कमी होऊन, गैरप्रवृत्तींना आळा बसण्यास मदत होणार आहे. रेशन दुकानांमध्ये वेळेवर धान्य उपलब्ध झाल्यास त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे.

धान्य वितरण प्रणालीत ऑनलाइन पध्दतीचाही वापर  सुरु करण्यात आला आहे. सध्याच्या प्रचलित पद्धतीनुसार रेशन दुकानदारांच्या धान्याची उचल करण्यासाठी चलन भरणे, ते संबंधित तहसील अथवा परिमंडळ कार्यालयात जाऊन तपासून घेणे, त्यानंतर ते चलन घेऊन बँकेत जाऊन रोख रक्कम भरणे आणि पैसे भरलेले चलन परत संबंधित कार्यालयात जमा करून त्यांच्याकडून धान्य उचल पावती घेणे या कामांसाठी किमान तीन ते चार फेर्‍या होतात. तसेच आपल्याला किती धान्यवाटप होणार आहे. त्याचे किती पैसे भरावे लागणार आहेत, याची माहिती घेण्यासाठीही संबंधित कार्यालयात वारंवार पाठपुरावा करावा लागतो. आता ही सर्व प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली आहे. रेशन दुकानदारांना रेशनचे धान्य मिळविण्यासाठी आणि त्याची रक्कम भरण्यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाने धान्यवाटप व पैसे भरण्याची सुविधा गव्हर्नमेंट रेव्हेन्यू ऑडिट सिस्टीम’ (जीआरएएस) प्रणालीद्वारे ऑनलाइन केली आहे.

त्यामुळे दुकानदारांना आपल्याला वाटप झालेल्या धान्याची, त्यासाठीच्या रकमेची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. धान्याची रक्कम भरण्याची सुविधा ऑनलाइन दिल्यामुळे दुकानदारांना आता चलन घेऊन बँकेत जाण्याची व पुन्हा ते चलन संबंधित कार्यालयात नेऊन देण्याची गरज भासणार नाही. तसेच आपल्याला वाटप झालेल्या धान्याची रक्कम कधीही भरता येणार असल्यामुळे दुकानदारांची सोय झाली आहे. दुकानदारांकडील बँकेत जमा झालेली रक्कम सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर सरकारच्या तिजोरीत जमा होत होते. त्यामुळे त्यास विलंब लागत होता. मात्र आता ऑनलाइन सुविधेमुळे धान्याचे पैसे थेट सरकारच्या तिजोरीत जमा होणार आहेत. पैसे भरल्याची पावती मिळाल्यानंतर थेट गोदामात जाऊन धान्य घेता येत असल्यामुळे दुकानदारांचे संबंधित कार्यालयातील हेलपाटे वाचणार आहेत.