Sun, May 19, 2019 14:47
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › ‘आयटूआर’ प्राप्त भूखंड विकासासाठी पालिका उदासीन

‘आयटूआर’ प्राप्त भूखंड विकासासाठी पालिका उदासीन

Published On: Jan 22 2018 1:23AM | Last Updated: Jan 22 2018 12:42AMपिंपरी : मिलिंद कांबळे 

पिंपरी-चिंचवड शहरात असलेल्या औद्योगिक भूखंड निवासी क्षेत्रात विकसित करण्यासाठी (आयटूआर) शासन नियमानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे ठराविक जागा हस्तांतरीत करावी लागते. त्यानुसार असंख्य जागेपैकी महापालिकेकडे केवळ 45 जागा ताब्यात आहेत. मात्र, महापालिका प्रशासनाच्या उदासीनतमुळे बहुतांश जागांचा विकास न केल्याने पडून आहेत.

पिंपरी-चिंचवड शहर औद्योगिकनगरी म्हणून ओळखली जाते. येथे सुमारे साडेसहा हजार पेक्षा जास्त लहान-मोठे उद्योग आहेत. मात्र, झपाट्याने विकसित होणार्‍या शहरात जमिनीला सोन्यापेक्षा अधिक भाव आहे. त्याच शहरात राहण्यासाठी मोठी पसंती दिली जात आहे. त्यामुळे सर्वत्र टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. शेतजमिनीचे क्षेत्र संपत आल्याने बांधकाम व्यावसायिकांचा लक्ष  आता औद्योगिक भूखंडावर पडले आहेत. परिणामी, उद्योगधंदे बंद करून त्या ठिकाणी निवासी विशेषता इमारती उभ्या केल्या जात आहे.  

औद्योगिक भूखंडाचे निवासी क्षेत्रात बदल करण्यासाठी (आयटूआर) एकूण जमिनीपैकी ठराविक जमिन शहराच्या नागरी विकासासाठी महापालिकेस हस्तांतरीत करावी लागते. या शासन नियमावर अंमलबजावणी 2005 पासून सुरू झाली आहे. आतापर्यंत महापालिकेच्या  ताब्यात एकूण 45 भूखंडाचा ताबा मिळाला आहे. त्यापैकी बहुतांश जागांवर अद्याप महापालिकेने विकास केलेला नाही. त्यामुळे या जागा धूळखात पडून आहेत. पिंपरीतील गांधीनगरसमोरील एका कंपनीची ताब्यात मिळालेली तब्बल 6 एकर जागेवर महापालिकेच्या काही विभागाचे कार्यालय सुरू करण्याचे नियोजन होते. मात्र, त्यात बदल करून त्या ठिकाणी आता पाण्याची टाकी बांधण्याचा प्रस्ताव आहे.  

पिंपरी परिसरात एकूण 14 जागा असून, एकूण क्षेत्र 42 हजार 907.47  चौरस मीटर आहे. चिंचवडमधील 8 जागांचे एकूण क्षेत्र 19 हजार 926.08 चौरस मीटर आहे. रावेतच्या 3 भूखंडाचे क्षेत्र 592.58 चौरस मीटर आहे. दापोडीतील 5 जागांचे क्षेत्र 532.53 चौरस मीटर आहे. वडमुखवाडीतील 5 जागांचे एकूण क्षेत्र 10 हजार 238.55 चौरस मीटर आहे. भोसरीतील 2 जागांचे क्षेत्र 292.61 चौरस मीटर, पुनावळेच्या 2 भूखंडाचे क्षेत्र 1 हजार 291.30 चौरस मीटर, आकुर्डीतील 2 जागांचे क्षेत्र 10 हजार 24.32 चौरस मीटर आहे.  दिघीतील 2 जागांचे क्षेत्र 373.33 चौरस मीटर आहे. चिखलीतील एका भूखंडाचे आकार 216.94 चौरस मीटर, मोशीतील एका जागेचे क्षेत्र 5 हजार 376.58 चौरस मीटर, डुडुळगावातील जागेचे क्षेत्र 33.62 चौरस मीटर आहे. 

औद्योगिक भूखंड निवासी करण्यासाठी महापालिकेकडे प्रस्तावाची संख्या वाढत आहे. त्यास मान्यता देऊन संबंधित क्षेत्र ‘आयटूआर’अंतर्गत ताब्यात घेऊन विकसित करण्याची महापालिका प्रशासनाची जबाबदारी आहे. त्या जागा तात्काळ ताब्यात घेऊन तेथे नागरिकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी केली आहे.