Thu, Nov 15, 2018 07:33



होमपेज › Pune › चिंकारा हरणाची शिकार करून पार्टी

चिंकारा हरणाची शिकार करून पार्टी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा





बारामती : प्रतिनिधी 

बारामती तालुक्यातील कऱ्हावागज परिसरातील वन परिक्षेत्रात चिंकारा हरणाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे कऱ्हा नदीच्या पात्रात शिकार करून पार्टी केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. ही पार्टी चिंकारा हरणाची शिकार करून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, नदीपात्रात झालेल्या पार्टीमध्ये नेमके कशाचे मटण वापरण्यात आले, याचा शोध वनविभागाचे अधिकारी घेत आहेत. 

रविवारी (दि. २५) कऱ्हा नदीच्या पात्रात वाळू उपसा करण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यालगतच चिंकारा जातीच्या हरणाशी मिळतीजुळती कवटी, तीन दगडांची चूल, त्यात भाजलेल्या नख्या, कुऱ्हाड, सुरे, दारूच्या बाटल्या, हाडकांचे तुकडे आढळून आले. त्यामुळे चिंकारा जातीच्या हरणाची शिकार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.  याबाबतची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी सुधाकर फरांदे, वनपाल टी. जे. जराड, सातपुते, वनरक्षक आर. डी. इंगवले, वनमजूर भानुदास बनकर यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. तसेच घटनास्थळावरून महत्वाचे पुरावे ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेली कवटी आणि इतर अवशेष तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात येणार असल्याचे सहाय्यक वनसंरक्षक वैभव भालेराव यांनी सांगितले. दरम्यान, या घटनेचा पंचनामा सुरू असतानाच कऱ्हावागजच्या वनविभागात एका चिंकारा हरणाचा संशयास्पद मृत्यू झाला. 

पाण्याच्या दुर्भिक्षामुळे बारामती तालुक्यातील चिंकारा हरिण मानवी वस्तीकडे धाव घेत असून तहान भागविण्यासाठी करावी लागणारी ही कसरत चिंकारा हरिणांच्या जिवावर बेतत आहे. बारामती तालुक्याच्या कऱ्हावागज, ढाकाळे, पणदरे, उंडवडी, जराडवाडी, गोजूबावी या भागात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आहे. त्यामुळे या भागात चिंकारा जातीची हरणांची संख्या  मोठ्या प्रमाणावर आहे.

या ठिकाणी दुर्मिळ वनौषधींसोबत  तरस, लांडगा, रानमांजर, सायाळ, वानर, ससा, मोर, गिधाड, घुबड यांचीही संख्या मोठी आहे. पाण्याचा स्रोत नसल्याने वन्यप्राण्यांवर  संकट कोसळले आहे. ज्या वनक्षेत्रात वन्यप्राण्यांचा अधिवास आहे, त्यातील बहुतेक ठिकाणी पाणी नसल्याने हरिणांना तहान भागविण्याकरिता मानवी वस्तीकडे धाव घ्यावी लागते. बारामती तालुक्यात  वनविभागाचे मोठे क्षेत्र आहे. त्यामुळे चिंकारा हरिणाची संख्या देखील मोठी आहे. मात्र, या भागात हरिणांची शिकार होत असल्याची चर्चा नेहमीच असते. पुण्यासह बारामती, फलटण भागातील लोक शिकारीसाठी येत असल्याचे बोलले जाते. त्यात स्थानिक नागरिक देखील कमी नाहीत. पाळीव कुत्र्यांच्या मदतीने ससे, घोरपड, हरीण यांची शिकार होत असते. तसाच काहीसा प्रकार येथे घडला असावा अशी शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली. परंतु तपासणी अहवालानंतरच येथे झालेली पार्टी नेमकी कशाची होती, याबाबत सांगता येईल असे वनविभागाकडून सांगण्यात आले.

Tags : Hunt, Deer, Forest, Pune, Crime, Animals






  •