Thu, Jun 27, 2019 12:30होमपेज › Pune › कामशेतकरांवर नाक मुठीत धरण्याची वेळ

कामशेतकरांवर नाक मुठीत धरण्याची वेळ

Published On: Jun 11 2018 1:07AM | Last Updated: Jun 11 2018 12:12AMकामशेत : वार्ताहर 

गेल्या सहा महिन्यांपासून कामशेतवासीयांची कचराकोंडी झाली असून, कामशेतमध्ये ठिकठिकाणी कचर्‍याचे ढीग साठले आहेत. गावातील कचरा समस्या कमी करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून रस्त्यावरच मोठ्या प्रमाणात कचरा जाळला जात होता; परंतु गेले काही दिवस मान्सूनपूर्व सरींनी हजेरी लावल्याने, कचरा भिजून परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे कामशेतवासीयांना नाक मुठीत धरून जगण्याची वेळ आली आहे. 

कामशेत परिसरात मोठ्या प्रमाणात कचर्‍याचे ढीग साठले आहेत. मान्सूनपूर्व पावसांच्या सरीमुळे कचर्‍याचे ढीग भिजल्याने त्यामधून परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत आहे. कचर्‍याच्या ढिगाजवळून जाताना ग्रामस्थांना श्‍वास घेणे देखील असह्य होत आहे. दिवसेंदिवस परिसरातील कचर्‍याचे ढीग वाढतच चालले असून, ग्रामपंचायत प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. मागील सहा महिन्यात कचरा टाकण्यासाठी कामशेत ग्रामपंचायतीस पर्यायी जागा मिळालेली नाही व कचरा व्यवस्थापनासाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था करण्यास यश आलेले नाही. कामशेत बाजारपेठेतील व्यापारी आपल्या दुकानात दिवसभर निर्माण झालेला कचरा संध्याकाळी रत्यावर टाकतात व जाळतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधीयुक्त धूर निर्माण होतो, परिणामी कामशेतवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. 

पावसाळा तोंडावर असून, कामशेतमधील रस्त्यांवर कचर्‍याचे ढीग लागले आहेत. मोठ्या पावसामुळे हाच कचरा रस्त्यांवरून वाहून आल्यास ग्रामस्थांना येथून चालणे मुश्किल होणार आहे; तसेच कचर्‍यामुळे गटारे तुंबण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या कचरा समस्येकडे ग्रामपंचायतीने गांभीर्याने बघने गरजेचे आहे, अन्यथा ऐन पावसाळ्यात कामशेतवासीयांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कामशेतमधील कचराकोंडीवर लवकर मार्ग शोधून यातून सुटका  करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे. 

या कचरा समस्येमुळे परिसरात माशा व मोठ्या प्रमाणात डासोत्पत्ती झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना डेंग्यू, मलेरिया आदी आजारांना सामोरे जावे लागेल; तसेच जाळण्यात येणार्‍या कचर्‍यामुळे मोठ्या प्रमाणात धूर निर्माण होऊन ग्रामस्थांना फुफ्फुसाचे आजार उद्भवू शकतात. कामशेतमधील प्राथमिक आरोग्य केंद्रालगत कचरा टाकला जात असल्याने आरोग्यकेंद्रात येणार्‍या रुग्णांवर याचा विपरीत परिणाम होत आहे. एकंदरीतच कचराकोंडीमुळे कामशेतवासीयांना नाक मुठीत धरण्याची वेळ आली आहे. या कचरा समस्येसंदर्भात कामशेच्या सरपंच सारिका घोलप. उपसरपंच नितीन गायखे व ग्रामसेवक प्रताप माने यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याविषयी काहीही बोलण्यास नकार दिला.