Thu, Apr 25, 2019 06:12होमपेज › Pune › स्माईल प्लसच्या माध्यमातून मायलेकरांची झाली भेट

स्माईल प्लसच्या माध्यमातून मायलेकरांची झाली भेट

Published On: Mar 22 2018 1:45AM | Last Updated: Mar 22 2018 1:21AMपिंपरी : प्रतिनिधी

तीन वर्षांपूर्वी सांगली येथून एक वयोवृद्ध मनोरुग्ण महिला घरातून निघून गेली होती. तब्बल तीन वर्षांनंतर कल्याण येथे ही महिला आढळल्याची माहिती स्माईल प्लस फाउंंडेशनचे संस्थापक अध्यक्ष योगेश मालखरे यांना मिळाली. त्यांनी तातडीन पावले उचलत महिलेला परत आणले आणि निगडी पोलिसांच्या मदतीने तिच्या मुलाकडे सुपूर्त केले. 

लीलाबाई बाबू राजपूत ही वयोवृद्ध महिला पूर्वी बोरे-आवळे विकून पोट भरत असे. कालांतराने त्यांची मानसिक स्थिती बिघडली. त्याच अवस्थेत ही महिला सांगलीतून रेल्वे प्रवास करत करत नाहीशी झाली. रिक्षा ड्रायव्हर असलेल्या मुलाने आईचा शोध घेतला; परंतु उपयोग झाला नाही. मात्र, स्माईल प्लसमुळे आई भेटल्याची भावना तिच्या मुलाने व्यक्त केल्या. 
तीन महिन्यांपूर्वी कल्याणहून योगेश मालखरे यांना एक महिला बेवारस अवस्थेत सापडल्याचा फोन आला. त्यावरून ते वयोवृद्ध आजीला पिंपरी-चिंचवड येथे घेऊन आले; त्यांनी आजीला तिच्या घरचा पत्ता विचारला. त्यानंतर मालखरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे आजीबाबत आवाहन केले. त्यावरून मुलगा सुनील राजपूत यांना आईचा ठावठिकाणा कळला आणि अखेर मायलेकराची भेट झाली. 
निगडी पोलिस स्टेशनचे पी. आय. विजय पळसुले यांच्या सहकार्याने आजींना सुखरूप मुलाकडे सुपूर्त करण्यात आल्याची माहिती मालखरे यांनी दिली. याकामी वाल्मीक कुटे, सुमंत ठाकरे, योगेश सोनवणे, विशाल चव्हाण, कार्तिक जाधव यांनी सहकार्य केले.