Wed, Jul 24, 2019 12:33होमपेज › Pune › सहायक पोलिस निरीक्षकासह चौघांना तीन वर्षे सक्‍तमजुरी

सहायक पोलिस निरीक्षकासह चौघांना तीन वर्षे सक्‍तमजुरी

Published On: Sep 05 2018 7:44AM | Last Updated: Sep 05 2018 2:14AMपुणे : प्रतिनिधी  

हडपसर येथील वासन आय केअर हॉस्पिटलचे 96 लाख रुपये लुटल्याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्याच्या तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षकांसह चौघांना अतिरिक्‍त सत्र न्यायाधीश ए. एस. भैसारे यांनी 3 वर्षेे सक्‍तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी लष्कर न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वाय. पी. पुजारी यांनी 18 फेब्रुवारी 2017 रोजी चौघाही आरोपींना  निर्दोष मुक्त केले होते. त्या निकालाच्या विरोधात मूळ फिर्यादी विशाल देविदास धेंडे (33, रा. पांडवनगर, गोखलेनगर) यांनी अपिलाद्वारे आव्हान दिले होते. या प्रकरणाचा दै. ‘पुढारी’ने सर्वप्रथम पर्दाफाश केला होता.

सहा. पोलिस निरीक्षक गिरीधर नकुल यादव (42, रा. परमारनगर, वानवडी), पोलिस कर्मचारी गणेश भानुदास मोरे (32, रा. हडपसर, साडेसतरा नळी, माळवाडी), त्यांचे सहकारी अविनाश संतराम देवकर (26)  आणि रवींद्र सोपान माने (30, दोघे रा. शिंदे वस्ती, वैदुवाडी, हडपसर) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. खटल्यात अतिरिक्‍त सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी काम पाहिले. 

या घटनेची पार्श्‍वभूमी अशी की, दि. 3 नोव्हेंबर 2015 रोजी वासन आय केअर हॉस्पिटलचे संचालक डॉ. श्रीधर रघुनाथ ठाकूर (51, रा. नरिमन पॉइंट, मुंबई), वरिष्ठ व्यवस्थापक सचिन ज्ञानदेव जगदाळे (36) व इंटिरियर डिझाईन चे कंत्राटदार दिनेश सावरलाल मिस्त्री (28, रा. मुंबई) हे मुंबईहून मगरपट्टा येथील वासन आय केअर सेंटर येथे बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आले होते. दिवाळी जवळ आल्याने मुंबईहून येतानाच त्यांनी कर्मचार्‍यांना दिवाळी बोनस व पगार वाटपासाठी 96 लाख रुपये बरोबर घेतले होते. डॉ. ठाकूर आणि सहकारी गाडीत पैशाची बॅग ठेवून फे्रश होण्यासाठी काही मिनिटांसाठी गेले.

परंतु ते परत आल्यावर एपीआय यादवने त्यांच्या गडीचा चालक विशालला गाडीसह पोलिस ठाण्यात नेल्याचे त्यांना समजले. यासंदर्भात त्यांनी तेथील पोलिसांना विचारले असता, त्यांनी एपीआय यादवला फोन केला. त्यानंतर तो व त्याचे सहकारी  विशालला घेऊन इनोव्हा गाडीसह चौकीत पोहोचले. यावेळी यादवने शक्‍कल लढविताना विशालने बेकायदेशीर काम केले असून, गाडीमध्ये हत्यारे सापडल्याचे सांगून 50 हजार रुपयांवर तडजोड करा, असे सांगितले. गुन्हा दाखल होण्याच्या भीतीने ती रक्‍कम पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर डॉ. ठाकूर यांनी 96 लाखांच्या पगाराच्या रकमेबाबत विचारणा केली असता, यादवने विशालला जबर मारहाण केली. तसेच ‘या सवार्र्ंनाच आत घ्या’ अशी धमकी दिली. तेथून कशीबशी सुटका करून घेतल्यानंतर दुसर्‍या दिवशी विशालने हडपसर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी संपर्क साधून भादंवि 394, 34 नुसार फिर्याद दिली. या प्रकरणी चौघांना तत्काळ अटक झाली. तसेच या प्रकरणात लुटलेले 96 लाख रुपयेही जप्त करण्यात आले. 

या प्रकरणी अ‍ॅड. देशमुख यांनी अपिलामध्ये युक्‍तिवाद करताना सांगितले की, लष्कर न्यायालयात झालेल्या सुनावणीत साक्षीदार आणि पंच फितूर झाले होते. मात्र, आरोपींनी न्यायालयात 313 नुसार जबाब देताना पैसे घेतल्याचे मान्य केले होते. 96 लाखांची रोकड घेतानाचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. हे पैसे विनापंचनामा जप्त करण्यात आले होते. त्याची स्टेशन डायरीला नोंदही केली नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. आरोपींचा बचाव करताना त्यांच्या वकिलांनी, तो काळा पैसा होता असे न्यायालयात सांगितले; मात्र तसे असेल, तर मग त्याबाबतचा गुन्हा का दाखल करण्यात आला नाही, असा सवाल सरकारी पक्षाने उपस्थित केला. यातून आरोपींचा पैसे लुबाडण्याचाच उद्देश दिसून येत असल्याचा युक्‍तिवाद अ‍ॅड. देशमुख यांनी केला. कुंपणानेच शेत खाल्ल्यावर सामान्य लोक न्याय मागण्यासाठी कोठे जाणार? कायद्याच्या रक्षकांनी हा प्रकार केला आहे. जबाबदारीचा गैरफायदा घेणार्‍यांना जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी केला. अपिलातील या खटल्यात सरकारी पक्षाचा युक्‍तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने चौघांनाही सक्‍तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.