होमपेज › Pune › दीड हजारच्या शिष्यवृत्तीसाठी तीन हजार रुपयांचे बँक खाते

दीड हजारच्या शिष्यवृत्तीसाठी तीन हजार रुपयांचे बँक खाते

Published On: Jun 16 2018 1:31AM | Last Updated: Jun 16 2018 1:05AMपिंपरी : प्रदीप लोखंडे

केंद्र सरकारची शिष्यवृत्ती हवी असल्यास आधारकार्ड व बँकेमध्ये खाते सक्तीचे केले आहे. तर बँकेमध्ये ‘झीरो बॅलन्स’ खाते सुरू केले जात नाही. त्यासाठी सुमारे दोन ते तीन हजार रुपये भरून खाते उघडावे लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दीड हजारच्या शिष्यवृत्तीसाठी सुमारे तीन हजार रुपयांचे खाते उघडावे लागणार आहे. एवढे पैसे देखील भरायला नसल्यामुळे कचरावेचकांच्या मुलांना शिष्यवृत्तीपासून वंचित रहावे लागत आहे.

केंद्र सरकारच्या वतीने अस्वच्छ व्यवसायात काम करणार्‍या पालकांच्या मुलांना अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्तीचे 1850 रुपये मिळतात. 2013 पासून ही शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली आहे. इयत्ता पहिले ते दहावीच्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळते. कचरावेचक संघटनेकडून पात्र विद्यार्थ्यांची यादी समाजकल्याण विभागाकडे देण्यात आली आहे. शाळांकडून ऑनलाईन अर्जही भरण्यात आले आहेत; मात्र आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न नसल्याने शिष्यवृत्ती देण्यात आलेली नाही. संघटनेचे सुमारे 100 विद्यार्थी यापासून वंचित राहिले आहेत. 2016-17 आणि 2017-18 या शैक्षणिक वर्षातील पहिली ते दहावीमध्ये शिकणार्‍या आणि या योजनेस पात्र असणार्‍या एक हजार 279 पात्र असणार्‍या विद्यार्थ्यांची यादी शासनाला दिली आहे. विद्यार्थ्यांना यादी देऊनही तांत्रिक अडचणी सांगितल्या जात आहेत.

बँक खाते सक्तीचे असल्यामुळे कागद-काच-पत्रा कष्टकरी पंचायतीच्या वतीने बँकांमध्ये खाते उघडण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. खाते सुरू करण्यासाठी ‘झिरो बॅलन्स’ ही पद्धती बंद झाल्याचे बँकांकडून सांगण्यात येत आहे. सुमारे दोन ते तीन हजार रुपये बँकेमध्ये भरून बँक खाते सुरू करावे, अशा सुचना बँकेकडून मिळत आहेत. कचरावेचकांच्या मुलांना एवढी रक्कम भरणे कठिण होत आहे. त्यामुळे त्यांना झिरो बॅलन्स वर खाते सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी कचरावेचक संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे. त्यासाठी वारंवार त्यांना आंदोलनाचे हत्यार उचलावे लागत आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेली शिष्यवृत्ती या विद्यार्थ्यांना मिळणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.