Thu, Apr 25, 2019 13:27होमपेज › Pune › मतदार यादीतून वगळली तीन हजार नावे

मतदार यादीतून वगळली तीन हजार नावे

Published On: Jul 03 2018 1:53AM | Last Updated: Jul 03 2018 12:42AMपुणे : प्रतिनिधी 

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने आगामी काळात होणार्‍या  निवडणुका लक्षात घेऊन प्रारूप मतदार यादी प्रसिध्द केली आहे. या यादीमधून सुमारे तीन हजार मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यामध्ये चिमटा वस्ती आणि भीमपुरा या वस्तीमधील जास्तीत जास्त मतदारांची नावे वगळली आहेत. याशिवाय इतर वॉर्डातील मतदारांची नावे सुध्दा वगळण्यात आली आहेत. त्यामुळे  बोर्डाच्या आठही वॉर्डमधील मतदारांची संख्या सुमारे 40 हजार 536 इतकी झाली आहे. 

देशभरातील सर्वच म्हणजे 62 कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये प्रत्येक वर्षी कॅन्टोन्मेंट निवडणूक कायदा 2007 च्या कलम 10(1) व 12 नुसार  मतदार यादी तयार करण्यात येते. या नियमानुसार बोर्डाच्या अधिकार्‍यांनी  आणि कर्मचार्‍यांनी घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून प्रारूप मतदार यादी केली आहे. बोर्डाचे अध्यक्ष मेजर जनरल प्रिथी सिंह यांच्या सहीने ही यादी 1 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली. तयार करण्यात आलेली मतदार यादी बोर्डाच्या कार्यालयात  उपलब्ध करून दिली आहे.  

यादीत नावे समाविष्ट नसल्यास तसेच इतर दुरुस्ती असल्यास हरकतींसाठी मतदारांना 15 ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आली आहे. नागरिकांच्या  हरकतींवर  अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी व नियुक्त सक्षम अधिकार्‍यांसमोर सुनावणी होणार आहे. सुनावणीनंतर  15 सप्टेंबरला  अंतिम यादी  प्रसिध्द होणार आहे.कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत सुमारे  70 ते 71 हजार लोकसंख्या आहे. कार्यालयाने सप्टेंबर 2017 मध्ये प्रसिध्द केलेल्या  मतदार यादीत एकूण लोकसंख्येपैकी तब्बल 43 हजार 861 मतदारांची नावे समाविष्ट होती. मात्र आगामी काळात होणार्‍या निवडणुकांसाठी मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. या यादीतील सुमारे तीन हजार मतदारांची नावे वगळली आहेत. अनधिकृत बांधकामे केलेले किंवा संरक्षण मालमत्ता अतिक्रमण करून बांधकाम केलेल्या नागरिकांची नावे मतदारयादीतून वगळण्यात यावीत, या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुमारे पंधराशे जणांची नावे यादीतून वगळली आहेत. याशिवाय  सेवानिवृत्ती, अधिकार्‍यांच्या, कर्मचार्‍यांच्या बदल्या झालेल्या आहेत. त्यांची सुमारे  पंधराशे जणांची नावे असून ती सुध्दा वगळली आहेत अशी माहिती प्रशासकीय अधिकार्‍यांनी दिली.

राज्य घटनेने नागरिकांना दिलेला मतदानाचा अधिकार कोणीही हिरावून घेऊ  शकत नाही. कॅन्टोन्मेंट हद्दीतील नागरिक लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान करू शकतात मग संबधीत व्यक्ती कोणत्याही जागेवर राहत असली तरी चालते. मग स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सुध्दा नागरिकांना मतदानाचा  हक्क मिळालाच पाहिजे. ज्या नागरिकांची नावे वगळलेली आहेत. त्यांनी 15 ऑगस्टपर्यत संबधीत अधिकार्‍यांशी संपर्क साधून योग्य ती कार्यवाही करणे गरजेचे आहे. असे मत नगरसेवक अतुल गायकवाड आणि किरण मंत्री यांनी व्यक्त केले.