Sat, Mar 23, 2019 12:10होमपेज › Pune › तीन सुरक्षा रक्षकांना पोलिसाची मारहाण

तीन सुरक्षा रक्षकांना पोलिसाची मारहाण

Published On: Jun 03 2018 1:18AM | Last Updated: Jun 03 2018 1:12AMपुणे : प्रतिनिधी 

सुरक्षेच्या कारणास्तव ओळखपत्र मागितल्याचा कारणावरून साध्या वेशातील पोलिसांनी महापालिकेच्या सुरक्षारक्षकांशी हुज्जत झातल्याचा आणि त्यानंतर पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनाच पोलिसांनी मारहाण करून पोलिस ठाण्यात नेल्याचा प्रकार शनिवारी महापालिकेत घडला. या प्रकारानंतर पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी मारहाणीच्या निषेधार्थ पालिकेच्या प्रवेशदारासमोर ठिय्या आंदोलन केले. 

महापालिकेत येणार्‍या प्रत्येक व्यक्तीला ओळखपत्र असल्याशिवाय आतमध्ये प्रवेश दिला जात नाही. पालिकेच्या अतिक्रमण विभागासाठी काम करणार्‍या साध्या वेशातील पोलिसांना शनिवारी दुपारी अडीचच्या दरम्यान महापालिकेतील सुरक्षा रक्षकांनी अडवले आणि वाहन पार्किंगमध्ये लावण्यास सांगितले. त्यावेळी त्या दोघांनी आम्ही पोलिस आहोत’ असे सांगितले. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्यांच्याकडे ओळखपत्र दाखविण्याची मागणी केली. तू ओळखपत्र मागणारा कोण?’ असे म्हणत पोलिसांनी ओळखपत्र दाखविण्यास नकार दिला. त्यामुळे पोलिस आणि सुरक्षारक्षक यांच्यात वाद झाला.

त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी या दोघांना आपल्या वरिष्ठांकडे नेले. त्यानंतर दोन सुरक्षारक्षक, त्यांचे वरिष्ठ आणि पोलिस कर्मचारी हे तिघेही लिफ्टने अतिक्रमण विभागासाठी नियुक्त असलेल्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपाली धाडगे यांच्याकडे जाऊ लागले. संबंधित पोलिस कर्मचार्‍याने लिफ्टमध्ये स्वतःच्या शर्टची बटणे तोडली. धाडगे यांच्याकडे गेल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी आपणास मारहाण केल्याचे आपल्या वरिष्ठ धाडगे यांना सांगितले. त्यानंतर कोणतीही शहानिशा न करता धाडगे यांनी दोन सुरक्षा रक्षकाना आणि त्यांच्या वरिष्ठांना मारहाण केली आणि सुरक्षारक्षकांना शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नेल्याची माहिती पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी दिली.

यासंदर्भात माहिती घेण्यासाठी पोलिसांकडे गेलेल्या वार्ताहरांना उपस्थित पोलिसांनी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. या प्रकारानंतर सर्व सुरक्षारक्षक मनपा भवनाच्या मुख्य इमारतीच्या पोर्चमध्ये जमा झाले. झालेल्या प्रकाराची नाराजीही त्यांनी व्यक्त केली. मात्र ठाण्यात गेल्यानंतर शिवाजी नगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी दोघांनाही समजावून सांगितले. त्यामुळे या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली नाही.