होमपेज › Pune › तीन शाळकरी मुले बेपत्ता

तीन शाळकरी मुले बेपत्ता

Published On: Jan 18 2018 1:46AM | Last Updated: Jan 18 2018 12:48AM

बुकमार्क करा
शिक्रापूर : वार्ताहर  

सणसवाडी (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वसेवाडी येथे तिसरी, पाचवी व सहावी मध्ये शिकणारी तीन शाळकरी मुले सोमेवारपासून (दि.15) शाळेत जाताना बेपत्ता झाली आहेत. या घटनेने सणसवाडीत खळबळ उडाली आहे. बेपत्ता मुलांच्या पालकांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रोहन महादेव आतार (11), रोहित महादेव आतार (9) व ओंकार रामा मुरकुटे (12) अशी बेपत्ता झालेल्या मुलांची नावे आहेत.

याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सणसवाडी येथे राहणारे महादेव आतार यांची मुलगी निकिता, तसेच रोहन व रोहित ही दोन मुले, तसेच त्यांच्या शेजारी राहणार्‍या बहिणीचा मुलगा ओंकार हे सणसवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वसेवाडी या शाळेमध्ये रोहन हा इयत्ता पाचवी, रोहित हा इयत्ता तिसरी, तर ओंकार हा इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेतात.

सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास आतार यांचे रोहन व रोहित ही दोन मुले तसेच त्यांच्या शेजारी राहणार्‍या बहिणीचा मुलगा ओंकार हे तिघे एकत्र शाळेमध्ये गेले होते. त्यानंतर काही वेळाने आतार यांची मुलगी निकितादेखील शाळेमध्ये गेली. 

सायंकाळी पाचनंतर निकिता घरी आली असता, तिने महादेव आतार यांना आज रोहित, रोहन व ओंकार हे शाळेत आले नसल्याचे सांगितले. त्यानंतर मुले शाळेचे दप्तर घेऊन शाळेमध्ये गेले होते. परंतु मुले शाळेत गेली नसल्याचे समजल्याने महादेव आतार, तसेच त्याच्या बहिणीने आजूबाजूला तसेच इतरत्र मुलांचा शोध घेतला; परंतु त्यांना तीनही मुले कोठे आढळून  आली नाहीत. त्यांनतर त्यांनी नातेवाइकांकडेदेखील चौकशी केली असता, मुलांबाबत काहीही माहिती मिळाली नाही. 

या बेपत्ता मुलांबाबत कोणासही काही माहीत असल्यास अथवा कोठे आढळल्यास शिक्रापूर पोलिसांशी 9881313353, तसेच 02137286333 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन शिक्रापूर पोलिसांनी केले असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवशांत खोसे हे करीत आहेत.