होमपेज › Pune › भरदिवसा लुटणार्‍या तिघा जणांना अटक

भरदिवसा लुटणार्‍या तिघा जणांना अटक

Published On: Dec 04 2017 1:35AM | Last Updated: Dec 04 2017 12:57AM

बुकमार्क करा





पुणे : प्रतिनिधी

बँकेत पैसे भरण्यासाठी आलेल्या ऑफिस बॉयच्या डोक्यात दगड घालून सव्वातीन लाख रुपयांची रोकड लुटणार्‍या तिघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 12 तासांच्या आत अटक केली. त्यांच्याकडून रोकडसह पावणेचार लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. प्रमोद व्यंकटेश तेलगू (वय 19), उमेश आदिनारायण बोया (वय 19) आणि योगेश धनराज द्रविड (वय 22, सर्व. रा. शीतळानगर, देहू रोड, ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. उमेश शिवाजी कदम (वय 30, रा. वाकड) याने फिर्याद दिली आहे. तो या घटनेत गंभीर जखमी झाला आहे. 

यातील फिर्यादी उमेश कदम हा वाकड येथील रुग्णालयात ऑफिस बॉय म्हणून नोकरीस आहे. त्याच्याकडे बँकांचेही व्यवहार असतात. कदमकडे शनिवारी रुग्णालयाने 3 लाख 23 हजारांची रोकड आणि चेक बँकेत भरण्यासाठी दिले होते.  त्यानुसार, तो सकाळी साडेअकराच्या सुमारास दुचाकीवरून बाणेर येथील एसबीआय शाखेत चेक  भरण्यासाठी आला. तो बँकेच्या पायर्‍या चढून जात असताना तिघे आरोपी  दुचाकीवरून (एम.एच.14.एफ.डब्ल्यू.4460) आले. आरोपींनी उमेशला पकडून अरिया टॉवर्सच्या गल्लीत नेले. लाथाबुक्क्यांनी मारले. त्यानंतर खाली पाडून मारहाण करत डोक्यात दगड घालून त्याच्याकडील 3 लाख 23 हजारांची रोकड असणारी बॅग घेऊन पसार झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या उमेशला नागरिकांनी जवळच्या रुग्णालयात नेले. त्यानंतर हा प्रकार समोर आला. स्थानिक पोलिसांसोबतच गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेऊन समांतर तपास सुरू केला. 

गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके हिंजवडी, वाकड आणि चतुःशृंगी परिसरात गस्त घालत गुन्हेगारांचा माग काढत होती. त्या वेळी दरोडा प्रतिबंधक पथकाचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कदम व त्यांच्या पथकाला अशोकनगर येथील जे.एस.पी.एम. कॉलेजसमोर आरोपी दुचाकीवर (एम.एच.14.एफ.डब्ल्यू.4460) संशियतरीत्या फिरत असल्याचे दिसले. आरोपींचा पाठलाग करून त्यांच्या दुचाकीला पोलिसांनी कार आडवी लावत त्यांना थांबवले आणि ताब्यात घेतले. त्यांच्याकडे तपास केला असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून 2 लाख 73 हजारांची रोकड, गुन्ह्यात वापरलेली 90 हजारांची दुचाकी असा एकूण 3 लाख 63 हजार रुपयांचा माल जप्त करत भरदिवसा घडलेल्या गंभीर गुन्ह्याची बारा तासांच्या आत उकल केली.  

लुटण्यात आलेली रोकड आरोपींनी वाटून घेतली. दरम्यान प्रमोद तेलगू हा चिंचवड परिसरातील एका कंपनीत हेल्पर म्हणून नोकरी करतो. इतर दोघेही खासगी ठिकाणी मिळेल ते कामे करतात. दरम्यान प्रमोद तेलगू हा यातील फिर्यादी नोकरी करत असणार्‍या वाकड परिसरातील रुग्णालयात मुलाखतीसाठी आला होता. मात्र, त्याला तेथे नोकरी मिळाली नाही. त्या वेळी जखमी उमेश कदम याने खुन्नस दिल्याचा गैरसमज प्रमोद याचा झाला होता. त्यानुसार, प्रमोदने इतर दोघांना एकाला मारहाण करायची असल्याचे सांगितले. त्यानुसार, तिघेही शनिवारी उमेशचा पाठलाग करत तेथे आले. त्यांनी उमेशला जबर मारहाण करत डोक्यात दगड घालून त्याच्याकडील बॅग पळवल्याचे तपासात समोर आले आहे. 

ही कारवाई गुन्हे शाखेचे उपायुक्त पंकज डहाणे, सहायक आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडाप्रतिबंधक पथकाचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कदम, सहायक निरीक्षक विद्युल्लता चव्हाण, लक्ष्मण ढेंगळे, उपनिरीक्षक संजय दळवी, कर्मचारी निलेश पाटील, महेश कदम, सचिन गायकवाड, बशिर सय्यद, शैलेश सुर्वे, प्रवीण जाधव यांच्या पथकाने केली.