Wed, Jul 17, 2019 20:04होमपेज › Pune › साडेतीन लाखाचे रक्तचंदन जप्त

साडेतीन लाखाचे रक्तचंदन जप्त

Published On: May 28 2018 1:38AM | Last Updated: May 28 2018 12:56AMपुणे : प्रतिनिधी

हैदराबादवरून पुण्यात विक्रीसाठी आणलेले तब्बल साडेतीन लाख रुपयांचे रक्तचंदन गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, त्याच्याकड़ून 59 किलो रक्तचंदन आणि कार असा एकूण साडेपाच लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे. 

राहुल हरिदास इंगळे (वय 30, रा. भूगाव, ता. मुळशी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस शिपाई इरफान मोमीन (वय 33) यांनी फिर्याद दिली आहे. त्याच्यावर कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

शहरात वाहन चोरी, लुटमार तसेच घरफोड्या करणार्‍या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. पोलिसांना या घटना रोखण्यात अपयश येत आहे. पोलिसांकडून हद्दीतील गस्त वाढविण्यात आली आहे. तर, गुन्हे शाखेच्या पोलिसांना सराईतांवर नजर ठेवून त्यांना जेरबंद करण्याचे आदेश  देण्यात आले आहेत. दरम्यान गुन्हे शाखा युनिट एकचे पथक कोथरूड परिसरात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एका लाल रंगाच्या कारमध्ये एकजण रक्तचंदन घेऊन विक्रीसाठी जात आहे. त्यावेळी पोलिसांनी वनाज कंपनीसमोर छापा टाकून राहुल इंगळे याला ताब्यात घेतले.

त्याच्या गाडीची झडती घेतली असता त्यात तोडून आणलेले रक्तचंदन मिळाले. त्यानुसार, पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली. त्यावेळी त्याने हे रक्तचंदन हैदराबादवरून आणल्याचे सांगितले. त्याच्याकडून साडेतीन लाखाचे 59 किलो रक्तचंदन व कार असा एकूण साडेपाच लाख 60 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. हे रक्तचंदन कोणाला विक्री करणार होता, याची माहिती घेण्यात येत आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे उपायुक्त पंकज डहाणे, सहायक आयुक्त समी़र शेख, युनिट एकचे निरीक्षक नितीन भोसले पाटील, उपनिरीक्षक हर्षल कदम, कर्मचारी खडके, जाधव यांच्या पथकाने केली.