Tue, Mar 19, 2019 09:59होमपेज › Pune › रिक्षाचालकामुळे परत मिळाले तीन लाखांचे दागिने

रिक्षाचालकामुळे परत मिळाले तीन लाखांचे दागिने

Published On: Jan 16 2018 2:15AM | Last Updated: Jan 16 2018 1:23AM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी 

सुमारे तीन लाख रुपयांचे सोने व चांदीचे दागिने असलेली बॅग रिक्षाचालकाने चौथ्या दिवशी प्रामाणिकपणे परत केली. त्यासाठी दुसर्‍या एका रिक्षाचालक व पोलिसांचे  सहकार्य मोलाचे ठरले. बॅग दागिन्यांसह पुन्हा मिळाल्याने चौहान कुटुंबीयांस मकरसंक्रातीच्या दिवशी सुखद गोड धक्का बसला आहे. अंबादास हराळे (वय 25, रा. अंजठानगर, चिंचवड) व जैनुद्दीन अब्बास शेख (वय 28, रा. रूपीनगर, निगडी) अशी त्या रिक्षाचालकांची नावे आहेत. 

पिंपरी कॅम्पातील रिव्हर रस्ता येथे राहणारे हिरा चौहान कुटुंबीय मुलीला पुन्हा सासरी मुंबईस सोडण्यासाठी चिंचवड रेल्वे स्थानकाकडे जाण्यास गुरुवारी (दि.11) दुपारी निघाले. सोबत 5 जणी असल्याने दोन रिक्षा केल्या. दागिन्यांची बॅग दुसर्‍या रिक्षातील महिलांकडे असेल, असे समजून सर्व जणी चिंचवड स्टेशनला आल्या; मात्र ती बॅगच नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. बॅगेत सोन्याचे मंगळसूत्र, नेकलेस, कर्णफुले, चेन, 2 अंगठ्या, 2 नथ, चांदीचा कमरपट्टा, जोडवी, 2 जोड पैंजण आदी सुमारे 3 लाख रुपये किमतीचे दागिने होते. ही बाब त्यांनी त्वरित विनोद यांना कळविली. त्यांनी रिव्हर रस्ता परिसरातील रिक्षाचालकांकडे विचारणा केली; मात्र काहीच माहिती कळाली नाही. 

त्यामुळे चौहान यांनी मोहननगर पोलिस चौकीत तक्रार नोंदविली. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या रेकॉर्डची मदत घेऊन संबंधित रिक्षाचा क्रमांक काढला. क्रमांक स्पष्टपणे दिसत नसतानाही तंत्रज्ञानाचा वापर करून एमएच 14 सीव्ही 305 असा क्रमांक शोधून काढला. त्या क्रमाकांची रिक्षा कोणाची आहे, असे विचारत विनोद चौहान व त्यांचे नातेवाईक पिंपरी चौकात फिरत होते, त्या वेळी रिक्षाचालक जैनुद्दीन शेख यांनी तो रिक्षाचालक अंजठानगरमध्ये राहत असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन हराळे याला बॅग घेऊन चौकीत बोलाविले. हराळेने रविवारी (दि.14) रात्री नऊच्या सुमारास दागिने असलेली बॅग चौकीत आणून दिली. मी परिसरात अनेकांना विचारले; मात्र कोणीच संपर्क न साधल्याने बॅग घरी सुरक्षित ठेवली, असे त्याने सांगितले. पोलिसांनी अशा प्रकारे बॅग आढळल्यास त्वरित जवळच्या पोलिस ठाण्यात जमा करण्याची सूचना त्याला केली.