Sun, May 19, 2019 13:58
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › ‘ती’च्या माफीसाठी शहरात तीनशे ‘फ्लेक्स’

‘ती’च्या माफीसाठी शहरात तीनशे ‘फ्लेक्स’

Published On: Aug 18 2018 1:02AM | Last Updated: Aug 18 2018 12:44AMपिंपरी : प्रतिनिधी

‘शिवडे आय एम सॉरी’  असा मजकूर असलेले ‘फ्लेक्स’ शहरभर झळकले. या ‘फ्लेक्स’बाबत नेमकी माहिती कुणाकडेच नव्हती. त्यामुळे सर्वप्रथम ‘पुढारी ऑनलाईन’ने या फ्लेक्सची बातमी ‘ब्रेक’ केली. त्यानंतर पोलिस यंत्रणा सतर्क झाली. फ्लेक्स लावणार्‍यांना ताब्यात घेतल्यानंतर पुण्यातील एका तरुणाने प्रेयसीशी वाद झाल्याने माफी मागण्यासाठी ‘फ्लेक्स’ लावल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी नीलेश संजय खेडकर (25, रा.घोरपडी, पुणे) आणि आदित्य विलास शिंदे (25,रा. राज पार्क, चिंचवड) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार नीलेश हा पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तो एका मुलीच्या प्रेमात असून त्यांच्यात काही कारणाने वाद झाला आहे. त्यामुळे त्याने ‘ती’ मुंबईवरून येण्याच्या मार्गावर आदित्यच्या मदतीने माफीचे 300 फ्लेक्स लावले. पोलिसांचा ससेमिरा मागे लागल्यावर निलेशने आपण एक ‘शॉर्ट फिल्म’ बनवत असून त्या जाहिरातीसाठी फ्लेक्स लावल्याचा बनाव केला. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच ‘फ्लेक्स’ लावल्याची कबुली त्याने दिली. दरम्यान; महापालिकेला शुक्रवारी सुट्टी असल्याने या फ्लेक्सपैकी किती अधिकृत य किती अनधिकृत फ्लेक्स आहेत, याची माहिती मिळू शकलेली नाही.   संबंधितांवर शहर विद्रुपीकरणाच्या कायद्याअंतर्गत उद्या शनिवारी गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.