पुणे : प्रतिनिधी
पुण्यातील झोपडपट्ट्यांमध्ये आता मजल्यांवर मजले पाहायला मिळण्याची शक्यता आहे. महापालिका हद्दीतील झोपड्यांची उंची 33 फुटांपर्यंत (10 मीटर) वाढविण्यासाठी राज्य शासनाकडे परवानगी घेण्यासाठीचा प्रस्ताव शहर सुधारणा समितीपुढे मंजुरीसाठी आला आहे. त्यावर आज शुक्रवारी समितीच्या बैठकीत निर्णय होणार आहे. हा प्रस्ताव पालिकेत व नंतर राज्य सरकारकडून मंजूर झाल्यास मुंबईतील वांद्रे, वरळी, माहीम, मालाड, गोरेगाव व धारावीच्या धर्तीवर पुण्यातही बहुमजली झोपड्यांचे पेव फुटण्याचा धोका आहे. मुंबईत बहुमजली झोपड्यांना कोट्यवधीची किंमत मिळते, तसेच पुण्यातील झोपडीधारक मालामाल होऊ शकतात.
पुणे महापालिका हद्दीतील झोपडपट्ट्यांमध्ये झोपडीच्या उंचीला 14 फुटापर्यंत राज्य शासनाची मंजुरी आहे. एवढ्याच उंचीपर्यंत झोपड्यांना संरक्षण मिळते. मात्र, ही उंची आता 33 फुटापर्यंत वाढविण्याची परवानगी मिळविण्याचा प्रयत्न महापालिकेकडून सुरू झाला आहे. यासंबधीचा प्रस्ताव सत्ताधारी भाजपचे नगरसेवक व स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बापुराव कर्णे यांनी दिला आहे.
झोपडपट्टीत शौचालय बांधण्यासाठी 14 फुट उंचीचे झोपडपट्टीत शौचालय बांधणे अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे झोपडपट्टीची उंची 14 फुटाऐवजी 33 फुट करण्यासाठी राज्य शासनाची परवानगी घेण्यासंबधीचा प्रस्ताव शहर सुधारणा समितीला दिला आहे. त्यावर आज शुक्रवारी समितीच्या बैठकित निर्णय होणार आहे. सद्यःस्थितीला शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये प्रामुख्याने एक आणि दोन मजल्यांच्या झोपड्या दिसतात. मात्र, या ठरावाला शासनाची मंजुरी मिळाल्यास पुण्यात तीन-तीन मजल्यांच्या झोपड्या दिसू शकणार आहेत.