Sat, Aug 17, 2019 16:52होमपेज › Pune › दहावी परीक्षेत तीन डमी विद्यार्थी

दहावी परीक्षेत तीन डमी विद्यार्थी

Published On: Jul 19 2018 1:38AM | Last Updated: Jul 19 2018 1:01AMपुणे : प्रतिनिधी

खडक परिसरातील एका शाळेत दहावीच्या मराठी विषयाच्या परीक्षेला तीन डमी विद्यार्थी बसल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी समोर आला आहे. याप्रकरणी सहा अल्पवयीन मुलांवर खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

याप्रकरणी प्रा. डॉ. नरहरी काशिनाथ घारपुरे प्रशालेच्या मुख्याध्यापिका शुभांगी पवार यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेले विद्यार्थी एकमेकांचे मित्र आहेत. मार्च महिन्यात झालेल्या परीक्षेत यातील तीन विद्याार्थी उत्तीर्ण झाले होते. तर तिघे अनुत्तीर्ण झाले होते. त्यानंतर उत्तीर्ण झालेल्या तीन मित्रांनी त्यांना फेरपरीक्षा द्यावी, असे सांगितले. त्यानुसार अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते.

मंगळवारी मराठी विषयाची फेरपरीक्षा परीक्षा होती. अनुत्तीर्ण झालेल्या तीन विद्याार्थ्यांच्या हॉलतिकिटवर या तिघा मित्रांनी स्वत:चे छायाचित्र चिटकवले आणि बनावट हॉलतिकिट तयार केले. तिघेजण मंगळवारी घारपुरे प्रशालेतील परीक्षा केंद्रावर गेले. त्यावेळी परीक्षा केंद्रातील पर्यवेक्षकांनी तिघांच्या हॉलतिकिटांची पाहणी केली. पाहणीत हॉल तिकिटे बनावट असल्याचे उघड झाले. तिघांची चौकशी करण्यात आली तेव्हा त्यांनी बनावट हॉलतिकिट तयार करून परीक्षा देण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले. त्यानंतर शाळेने पोलिसांना याची माहिती दिली. त्यानुसार, गुन्हा दाखल करून सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सर्व मुले 15 ते 17 वयोगटातील आहेत. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक व्ही. डी. केसरकर हे करत आहेत.