Thu, Jul 02, 2020 20:09होमपेज › Pune › पुणे विमानतळावर तीन कोटींचे सोने जप्‍त

पुणे विमानतळावर तीन कोटींचे सोने जप्‍त

Published On: Aug 17 2018 1:36AM | Last Updated: Aug 17 2018 1:00AMपुणे : दुबईहून आलेल्या स्पाईसजेट विमानातून आणलेले तब्बल 10 किलो 175 ग्रॅम वजनाची 86 सोन्याची बिस्किटे सीमा शुल्क विभागाने गुरुवारी जप्‍त केली. या सोन्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात तीन कोटी रुपये आहे. प्रवाशाने विमानतळावर उतरल्यानंतर तेथील स्वच्छतागृहातील कचरापेटीमध्ये ही 86 सोन्याची बिस्किटे मिळून आली. दुबईहून पुण्यात मोठ्या प्रमाणावर सोनेतस्करी करण्यात येत असल्याची माहिती पुण्यात नव्याने स्थापन केलेल्या महसूल गुप्तवार्ता संचालनालयाला मिळाली होती़  याबाबत विमानतळावरील सीमा शुल्क विभागाला माहिती देण्यात आली. त्यानंतर दुबईहून आलेल्या स्पाईसजेटच्या विमानातील सर्व प्रवाशांची कसून तपासणी करण्यात आली़  परंतु, त्यांच्याकडे काहीही संशयास्पद मिळाले नाही़  त्यानंतर अधिकार्‍यांनी विमानतळावर सर्वत्र शोध घेण्यास सुरुवात केली़

प्रवासी विमानातून पहिल्या मजल्यावर उतरून तेथून खाली तपासणीसाठी येताच तेथील पहिल्या मजल्यावर पुरुषांच्या स्वच्छतागृहात तपासणी केली. त्या वेळी तेथील कचरापेटीत (डस्टबिन) मोबाईलच्या चार मोठ्या कव्हरमध्ये ही 86 सोन्याची बिस्किटे त्यांना आढळली; त्याचबरोबर 2 सोन्याची वेढणीही त्यात होती़  या बिस्किटांचे वजन 10.175 किलो असून, त्याची किंमत 3 कोटी 9 लाख, 34 हजार 675 रुपये इतकी आहे़ सीमा शुल्क विभागाने यापूर्वी 7 किलोपर्यंतचे तस्करी करून आणलेले सोने पकडले होते. मात्र, त्यानंतर आता तीन कोटी रुपयांचे सोने पकडण्यात आले असून, ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे.