Wed, Mar 20, 2019 08:50होमपेज › Pune › कासारवाडी शाळेसाठी खासदार रेखांकडून तीन कोटींचा निधी

कासारवाडी शाळेसाठी खासदार रेखांकडून तीन कोटींचा निधी

Published On: Jan 11 2018 1:28AM | Last Updated: Jan 11 2018 12:00AM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कासारवाडी येथे बांधण्यात येणार्‍या शाळेच्या इमारतीसाठी राज्यसभा खासदार रेखा गणेशन 3 कोटी रूपयांचे आर्थिक सहाय देणार आहेत. त्यामुळे महापालिकेची आर्थिक बचत झाली आहे. त्यासाठी स्थानिक नगरसेवक श्याम लांडे यांनी पाठपुरावा केला होता. 

कासारवाडी येथील सर्व्हे क्रमांक 420 येथील छत्रपती शाहु महाराज विद्यामंदिराच्या  आवारात 5 मजली प्रशस्त शाळा महापालिका बांधणार आहे. या शाळेच्या इमारतीसाठी 13 कोटी 71 लाख 32 हजार 197 रुपये खर्च अपेक्षित आहे. या खर्चाला स्थायी समितीने 26 डिसेंबरला मान्यता दिली आहे. 

विद्यालयाच्या आवारात पाच मजली प्रशस्त शाळा बांधण्यात येणार आहे. या कामासाठी 13 कोटी 71 लाख 32 हजार 197 रुपये खर्च येणार आहे. इमारत बांधण्याचे काम एस. एस. साठे या ठेकेदाराला देण्यात आले आहे. कामाची मुदत दोन वर्षांची आहे. एकूण भूखंडाचे क्षेत्र 8 हजार 911.30 चौरस मीटर आहे. सद्यःस्थितीत शाळेचे क्षेत्र 3 हजार 789.21 चौरस मीटर आहे. 2 हजार 861.81 चौरस मीटरमध्ये शाळा इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे.

तळमजल्यावर वाहनतळ असणार आहे. बालवाडीसह एकूण 41 वर्ग असणार आहेत. प्रशासन, प्राचार्य कार्यालय, ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगणक रूम, मल्टीपर्पज हॉल, मुला-मुलींसाठी प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र स्वच्छतागृह असणार आहे. अपंगांसाठी रॅम्प, लिफ्ट व स्वतंत्र शौचालय, 1 हजार 550 चौरस मीटर खेळाचे मैदान आणि संपूर्ण शाळेसाठी सीमाभिंत व कमान बांधण्यात येणार आहे. या संदर्भात नगरसेवक लांडे  यांनी पाठपुरावा केला आहे. 

शाहू महाराज विद्यामंदिरात मुले व मुलींच्या स्वच्छतागृह बांधण्यासाठी खासदार रेखा यांनी दोन वर्षांपूर्वी 20 लाख रूपयांचा निधी दिला होता. त्यामुळे त्याच्याकडे नव्या इमारतीसाठी निधी मागण्यासाठी पत्र पाठविण्याची मागणी नगरसेवक लांडे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर याकडे 8 नोव्हेंबर 2017 ला केली होती. त्या खासदार रेखा यांनी प्रतिसाद देत  जानेवारी 2018 ला जिल्हा नियोजन समितीकडे पत्र पाठवून निधी वर्ग करण्याची सूचना केली आहे. या निधीमुळे महापालिकेची आर्थिक बचत झाल्याचे नगरसेवक लांडे यांनी सांगितले. सदर शाळा आकांक्षा फाउंडेशन व थरमॅक्स कंपनीमार्फत ‘सीएसआर’ अंतर्गत चालविली जाणार आहे.