Thu, Jun 27, 2019 17:44होमपेज › Pune › ध्वजस्तंभ उभारणीचा साडेतीन कोटींचा खर्च पाण्यात

ध्वजस्तंभ उभारणीचा साडेतीन कोटींचा खर्च पाण्यात

Published On: Aug 06 2018 1:54AM | Last Updated: Aug 06 2018 1:09AMपिंपरी :  मिलिंद कांबळे 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मोठा गाजावाजा करीत देशातील सर्वाधिक  107 मीटर उंचीच्या निगडीतील ध्वजस्तंभावर 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि 1 मे रोजी ध्वजारोहण केले जाणार आहे. त्यामुळे स्तंभ उभारण्याचा मूळ उद्देशाला हरताळ फासण्याचे काम पालिका प्रशासनाने केले आहे. यापुढे स्तंभावर दररोज तिरंगा दिसणार नाही. परिणामी, तब्बल साडेतीन कोटींचा खर्च पाण्यात गेल्याचे स्पष्ट होत आहे. 

‘निगडीच्या स्तंभावर 15 ऑगस्टला ध्वजारोहण?’ या शीर्षकाखाली ‘पुढारी’ने शुक्रवारी (दि.3) ठळक वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यावर शहरभरातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. या सर्वात उंच ध्वजस्तंभामुळे शहरातील सौंदर्यात भर पडली. शहराच्या नावलौकिकात मानाचा तुरा खोवला गेला. स्तंभावर दिवस-रात्र ध्वज असणार या अटीवर तो उभारला गेला. त्यासाठी तब्बल साडेतीन कोटी रूपये खर्च पालिकेने केले. या कामाचे भूमिपूजन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. तर, अनावरण सत्ताधारी भाजपच्या काळात 26 जानेवारी 2018 ला झाले. 

जानेवारीनंतर विविध तांत्रिक कारणांमुळे गेल्या 4 महिन्यांपासून स्तंभावर ध्वजच नाही.  वार्‍यामुळे 80 किलो वजनाचा ध्वजाचे कापड फाटत असून, वारंवार ध्वजाचे कापड बदलण्याचा खर्च वाढत आहेत. पावसामुळे ध्वजाचे वजन वाढूनही तो फाटत असल्याने खर्च वाढत आहे. त्यामुळे तो काढून ठेवल्याचा दावा पालिका अधिकार्‍यांनी केला आहे. केवळ 15 ऑगस्ट, 26 जानेवारी व 1 मे रोजी ध्वजारोहण होईल, असे अधिकारी सांगत आहेत. 

देशातील सर्वात उंच ध्वजस्तंभ असणार म्हणून मागील सत्ताधारी राष्ट्रवादीने या योजनेला मान्यता दिली होती; मात्र जास्त उंचीवर ध्वज उभारल्याने  वारा आणि पावसात खराब होईल, हे पालिकेच्या अधिकार्‍यांना किंवा संबंधित ठेकेदारास माहीत नव्हते का? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. लष्काराने वाघा बॉर्डरवर उभारलेल्या स्तंभावरील ध्वजाचे कापड फाटत असल्याचा प्रकार पालिका अधिकार्‍यांना माहिती नव्हता का?  दापोडीतील सीएमईमध्ये सुमारे 30 मीटर उंचीच्या स्तंभावर दिवस-रात्र राष्ट्रध्वज फडकत आहे. त्यामुळे सर्वाधिक उंचीचा ध्वजस्तंभ हा अट्टहास अधिकार्‍यांसह तत्कालीन पदाधिकार्‍यांनी का धरला, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. या सर्व कारणांमुळे शहरवासीयांच्या भावना दुखावल्या गेल्या असून, तब्बल साडेतीन कोटींचा खर्च वाया गेल्याचे मत व्यक्त केले जात आहे.  

उच्च दर्जाचे कापड मिळाल्यास कायमस्वरूपी ध्वज

निगडीतील ध्वजस्तंभावर 120 बाय 80 फूट आकाराचा 80 किलो वजनाचा तिरंगा ध्वज आहे. वेगवान वार्‍यामुळे ध्वजाचे कापड फाटत आहे. राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये म्हणून तो काढून ठेवला आहे. उच्च दर्जाचे आणि टिकाऊ कापडाचा राष्ट्रध्वज तयार करण्याचे निर्देश त्याच वेळी पालिका प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार कापड उत्पादक कंपन्यांशी पत्रव्यवहार सुरू आहे. स्वातंत्र्यदिनी तेथे ध्वजारोहण केले जाणार आहे. ध्वजासाठी योग्य कापड उपलब्ध झाल्यास स्तंभावर कायमस्वरूपी ध्वज राहील, अशी व्यवस्था केली जाईल, असे पालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी सांगितले.