Mon, Apr 22, 2019 16:02होमपेज › Pune › भूमिगत वाहिन्या तुटण्यामुळे तीन कोटींचा फटका

भूमिगत वाहिन्या तुटण्यामुळे तीन कोटींचा फटका

Published On: Sep 06 2018 1:49AM | Last Updated: Sep 06 2018 1:49AMपुणे : प्रतिनिधी 

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेसह अनेकजण विविध कामासाठी वरचेवर रस्त्यांमध्ये आणि आसपास खोदकाम करत असतात. खोदकाम करताना ठेकेदार हलगर्जीपणाने काम करत असतो. त्यामुळे भूमिगत उच्चदाब  वीजवाहिन्या तुटत आहेत. वर्षभरात दोन्ही शहरात सुमारे  साडेचारशे वीजवाहिन्या तुटल्या आहेत. यामुळे सुमारे तीन कोटी रुपयांपेक्षा अधिक  नुकसान झाले असल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यातच वीजवाहिनी तुटल्यामुळे संबंधित भागातील वीजपुरवठा खंडित राहत असल्याने नुकसानीची मोजणी करणे अवघड आहे, अशी  माहिती पुणे परिमंडलातील उच्चपदस्थ अधिकार्‍यांनी दिली.  दरम्यान, शहरात  भूमिगत वीजवाहिन्या तुटण्याचे सर्वाधिक प्रकार पद्मावती,  धनकवडी, मार्केट यार्ड, बिबवेवाडी, कात्रज, आंबेगाव, गुलटेकडी, भवानी पेठ, गंजपेठ, सहकारनगर, बालाजीनगर, सातारा रस्ता या भागात झाले असल्याचे दिसून आले आहे. पुण्यात तीनशे तर पिंपरी चिंचवड भागात सुमारे दीडशे वाहिन्या वर्षभरात तुटलेल्या आहेत. 

शहर आणि पिंपरी चिंचवड परिसरात  सातत्याने विविध भागात कायमच  कामे सुरू असतात. मात्र, खोदाईची कामे करताना कुठे ना कुठे भूमिगत वाहिन्या तुटण्याच्या घटना घडत असतात. तुटलेल्या भूमिगत वाहिन्यांची दुरुस्ती करणे ही बाब खर्चिक तसेच वेळखाऊ  आहे. त्यामुळे दुरुस्तीची कामे पूर्ण होईपर्यत संबंधित भागातील वीज पुरवठा खंडित राहतो. त्यामुळे महावितरणला होणार्‍या नुकसानाची मोजणी करणे अवघड आहे.  पुणे आणि  पिंपरी-चिंचवड शहरात बहुतांश भागास भूमिगत वीजवाहिन्यांच्या माध्यमातूनच वीजपुरवठा करण्यात येत आहे. परिणामी खोदकाम करताना कित्येक वेळा काम करणारे ठेकेदार महावितरणला कळवत नाहीत. त्यामुळे  भूमिगत वीजवाहिन्या कोठे आहेत याची माहिती कोणालाही नसते. तसेच  खोदकाम करताना दक्षता घेतली जात नाही. भूमिगत वीजवाहिन्या तुटल्यामुळे संबंधित विभागातील वीजपुरवठा खंडित होतो. पुणे शहरामध्ये मागील वर्षभरात अशा प्रकारच्या तीनशे, तर पिंपरी चिंचवड शहरात साधारणपणे दीडशेच्या आसपास घटना घडल्या आहेत. 

वीजवाहिन्या तुटल्यानंतर त्याच्या दुरुस्तीसाठी खूप वेळ लागतो.  परिणामी संबंधित भागातील वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांचा नाहक त्रास सहन करावा लागतो. शिवाय महावितरणच्या महसुलावरही परिणाम होतो. अनेक वेळा  महावितरण कंपनीचे अधिकारी संबंधित ठेकेदाराच्या विरोधात पोलिसामध्ये तक्रारी देऊन  गुन्हे दाखल करत असतात. मात्र, तक्रारी अदखलपात्र असल्याने पोलिसांकडून देखील कारवाई  होत नाही. विशेष म्हणजे दोन्हीही शहरात  कोणत्याही वेळेला खोदकाम सुरू असते.  खोदकाम करताना महावितरण, बीएसएनएल, महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनी आदी यंत्रणांशी समन्वय साधण्याची गरज असते. परंतु  त्याबाबत दक्षता घेतली नसल्याने त्याचा फटका या कंपन्याबरोबरच नागरिकांनाही बसत आहे.