Tue, Aug 20, 2019 04:08होमपेज › Pune › फसवणार्‍या तिघांना अटक

फसवणार्‍या तिघांना अटक

Published On: Jan 10 2018 1:59AM | Last Updated: Jan 10 2018 1:11AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

नापतोल शॉपिंग सेंटरमधून खरेदी केलेल्या वस्तूवर सव्वा तेरा लाखांची लॉटरी लागल्याचे सांगून वेगवेगळ्या कारणांनी खात्यावर एकाला पैसे भरायला लावत तब्बल दोन लाख 40 हजारांचा गंडा घातला. याप्रकरणी तीन जणांना सायबर गुन्हे शाखेने झारखंड येथील रामगढ येथून अटक केली. 

रोशनकुमार किशोर मिस्त्री (22, रामगढ कॉलेज कॉलनी झारखंड, मूळ बिहार) व जितेंद्रकुमार आसो राऊत (27, रामगढ कॉलेज कॉलनी झारखंड), सुबोधकुमार दिनेश चौधरी (20, रामगढ कॉलेज कॉलनी झारखंड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. मागील महिन्यात वारजे माळवाडी येथील चंदर चव्हाण यांना अज्ञात व्यक्तीचा फोन आला. नापतोलवरून घेतलेल्या मोबाईल फोनवर तीन लाख 20 हजार रुपयांची लाॉटरी लागली असल्याचे सांगून त्याची कागदपत्रे पोस्टाने पाठविल्याचे सांगितले. त्यानंतर त्यामध्ये मिळालेल्या कुपनमध्ये दहा लाखांचे लॉटरीचे कुपन पाठविले असून एकूण 13 लाख 20 हजार रुपये किंमतीची लॉटरीची रक्कम खात्यावर जमा करण्यासाठी व प्रोसेसिंग फीच्या नावाखाली 2 लाख 40 हजार रुपये खात्यावर जमा करावयास लावली. त्यानंतर लॉटरीचे पैसे खात्यावर जमा झाले नाहीत. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसात फिर्याद दिली. या प्रकारानंतर सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास सुरू केला.  पोलिसाच्या एका पथकाने रामगढ येथे जाऊन तिघांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्याकडून 32 मोबाईल, 33 सिमकार्ड, 7 डेबिट कार्ड, 16 रबरी शिक्के, तसेच लोकांनी पाठविलेले कुरिअर, तसेच महाराष्ट्रातील लोकांची नावे लिहून पाठविण्यासाठी तयार असलेले सीलबंद पार्सल असा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सायबर गुन्हे शाखेचे उपायुक्त सुधार हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक राधिका फडके, पोलिस उपनिरीक्षक नितीन खामगळ यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक पायगुडे करत आहेत.