Sat, Jul 20, 2019 02:54होमपेज › Pune › साडेतीन लाख पुणेकरांचे 'मुख' अस्वच्छ

साडेतीन लाख पुणेकरांचे 'मुख' अस्वच्छ

Published On: Dec 30 2017 1:30AM | Last Updated: Dec 30 2017 1:11PM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

सार्वजनिक आरोग्य विभागाने सुरू केलेल्या  एक ते 27 डिसेंबरदरम्यानच्या मौखिक आरोग्य तपासणी मोहिमेत तंबाखू/सुपारी खाणारे आणि मुख अस्वच्छ असणार्‍यांची संख्या साडेतीन लाख असल्याचे आढळून आले आहे. त्याचबरोबर तोंड उघडता न येणे, पांढरा -लाल चट्टा, लालसर त्वचा आदी स्वरूपाच्या रुग्णांचीदेखील संख्या अधिक आहे.

प्रत्येक व्यक्तीची मौखिक स्वच्छता असणे हे निरोगी जीवनाचे लक्षण आहे. मुख स्वच्छता ठेवणार्‍या आणि कोणतेही व्यसन नसलेल्या नागरिकांना मौखिक आजारांचा धोका नसतो; मात्र तंबाखू, सुपारी यांच्यासह अतिमद्यसेवन करणार्‍यांना अस्वच्छ मुख, कर्करोग व इतर आजारांचा धोका बळावतो.

मौखिक आरोग्य अबाधित राखण्यासाठी आणि जनजागृती निर्माण करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेत आतापर्यंत 30 वयोगटापुढील पुण्यातील सुमारे 6 लाख 46 हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 46 हजार जणांना दारूचे व्यसन, तंबाखू-सुपारीचे व्यसन असणार्‍यांची संख्या एक लाख 43 हजार, मुख अस्वच्छ असणारे दोन लाख चार हजार, तोंड न उघडता येणारे एक हजार 360, तोंडाला पांढरा व लाल चट्टा असणारे दोन हजार 849, त्वचा जाडसर असणारे 697 इतके रुग्ण सापडले आहेत.

एक महत्त्वाची बाब म्हणजे मुख स्वच्छ असणार्‍यांची संख्या सर्वाधिक चार लाख 41 हजार असून, एक हजार 899 रुग्णांना उपचारांची गरज पडली असून, त्यांना उपचारांसाठी इतर ठिकाणी पाठवण्यात आले असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक कार्यालयाने दिली.