Fri, Jan 24, 2020 23:28होमपेज › Pune › साडेतीन लाखांचा मद्यसाठा जप्त

साडेतीन लाखांचा मद्यसाठा जप्त

Published On: Dec 29 2017 1:32AM | Last Updated: Dec 29 2017 1:31AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

गोवा, हरियाना, दीव-दमण येथील निर्मित आणि सैन्याकरिता राखील असलेले मद्य चोरट्या मार्गाने तस्करी करून विक्री करत असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली. त्यानुसार टाकलेल्या छाप्यात तीन लाख 57 हजार 850 रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे. या प्रकरणात माणिकचंद गोपालन नायर (वय 58, रा. शक्तीनगर घोरपडी) विरोधात मुंबई कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.    

मद्याचे पेग रिचवत नवीन वर्षाचे स्वागत करण्याचा नागरिकांचा कल पाहता नववर्षाच्या पूर्वसंध्येला  गोवा, दीव-दमण येथील निर्मित आणि सैन्यासाठी राखीव असलेले मद्य चोरट्या मार्गाने विक्री केली जाते.  हे रोखण्यासाठी उत्पादन शुल्कच्या 12 विभागात आठ आणि विशेष 2 पथके कार्यरत आहेत. भरारी पथक क्रमांक 2 ला घोरपडीतील भारत फोर्ज रस्त्यावर शक्‍तिनगरमध्ये गोवा, हरियाना, दीव-दमण येथील निर्मित आणि सैन्याकरिता राखील असलेले मद्य नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला विक्रीसाठी साठवल्याची  माहिती मिळाली. त्यानुसार वसंत कौसडीकर यांच्या पथकाने छापा टाकून हरियाना बनावटीच्या 750 मिली क्षमतेच्या गोवा आणि सैन्यासाठी राखीव असलेले 389 बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत, तर 180 मिली क्षमतेच्या 29 बाटल्या व 2 लाख 13 हजार 530 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

पथकाने ताब्यात घेतलेल्या आरोपी नायरने तपासात दिलेल्या माहितीच्या आधारे दापोडीतील लोहमार्गालगत असलेल्या काटे वस्तीतील शंभुराजे चिकन अ‍ॅण्ड सेंटरवर छापा टाकूण हरियाना बनावटीचे 750 मिलीचे 103 आणि गोवा निर्मित रियसल रम 750 क्षमतेच्या 127 बाटल्या असा 1 लाख 44 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

ही कारवाई उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्‍त अर्जुन ओव्हळ, उपाधीक्षक सुनील फुलपगार, प्रवीण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख वसंत कौसडीकर, उपनिरीक्षक राजेंद्र झोळ, कैलास वाळुंजकर, जवान महेश वनसोडे, सुनील कुदळे, वाहन चालक केशव वामने यांनी केली.