Thu, Apr 25, 2019 11:46होमपेज › Pune › #Women’sDayशेतकरी कुटुंबातील तीन सख्ख्या बहिणी पोलिस अधिकारी

#Women’sDayशेतकरी कुटुंबातील तीन सख्ख्या बहिणी पोलिस अधिकारी

Published On: Mar 08 2018 1:20AM | Last Updated: Mar 08 2018 1:20AMआई-वडील अशिक्षित, दोघेही शेतकरी. तीन मुलींच्या पाठीवर एक भाऊ अन् त्यानंतर पुन्हा तीन मुलीच. घरात एकूण सहा मुली अन् एक मुलगा. घरातील परिस्थिती तशी बेताचीच. तरीही त्यांच्या माता-पित्याने न डगमगता त्यांना उच्चशिक्षित करण्याचे स्वप्न बाळगले. त्या तिघींनी त्यांचे स्वप्न सत्यात उतरवत, पोलिस दलात अधिकारीपद मिळविले. थक्‍क करणारी ही कहाणी आहे, पुणे जिल्ह्यातील म्हस्के कुटुंबाची. विशेष म्हणजे, यातील पहिली मुलगी लग्नानंतर पहिली शासकीय नोकरी सोडून, पतीच्या इच्छेपोटी पोलिस अधिकारी झाली आहे. तिघीही सध्या पुणे पोलिस दलात कर्तव्य बजावित आहेत. 

शुभांगी पवार-म्हस्के, कीर्ती म्हस्के व गिरिजा म्हस्के अशी या पोलिस अधिकारी बहिणींची नावे आहेत. तिघीही स्पर्धा परीक्षेतून पोलिस दलात पोलिस उपनिरीक्षक झाल्या आहेत. शुभांगी पवार-म्हस्के या सध्या पुण्यातील राज्य गुप्ता वार्ता विभागात कार्यरत आहेत. तर, गिरिजा या पुणे पोलिस दलातील समर्थ पोलिस ठाण्यात आहेत, तर कीर्ती या कोेंढवा वाहतूक शाखेत कर्तव्य बजावत आहेत. 

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असलेल्या इनाम गावातले हे म्हस्के कुटुंब. भरत व मंगल म्हस्के यांना सहा मुली व एक मुलगा. भरत म्हस्के हे सातवी व मंगल यांचे चौथीपर्यंत शिक्षण झालेले. त्यानंतर त्यांना प्रतिभा, शुभांगी, स्मिता या तीन मुली झाल्या. तिघींच्या पाठीवर सिद्धेश्‍वर मुलगा झाला आहे. मनीषा, कीर्ती व गिरिजा या तीन मुली झाल्या. म्हस्के यांचा शेती हाच व्यावसाय. तशी घरची परिस्थिती हालाखीचीच. पण, 17 एकर शेतीतून मिळालेल्या उत्पन्नावर कुटुंबाचा उदरनिर्वाह. शुभांगी, प्रतिभा, स्मिता व मनीषा यांचे विवाह झाले आहेत. तर, गिरिजा व कीर्ती या मात्र, त्यांच्या पतीला शुभांगी यांनी पोलिस अधिकारी व्हावे, असे वाटत होते. 2011 मध्ये स्पर्धा परीक्षा दिली. त्या पहिल्याच प्रयत्नात पोलिस उपनिरीक्षक म्हणून पोलिस दलात भरती झाल्या. दरम्यान, कीर्ती व गिरिजा यांनीही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला होता.

त्यातच शुभांगी यांची निवड झाल्याने त्यांची इच्छा अधिकच बळकट झाली. तिघींच्या यशानंतर आई-वडील आनंदी झालेच. एकीकडे देश एकविसाव्या शतकात मुली वाचवाचा नारा देतोय. एका मुलीनंतर दुसरी मुलगी झाली की, तिला भर रस्त्यावर सोडून दिले जात आहे. तर, अनेक ठिकाणी मुलीच होत असल्याने महिलांचा छळ तर होतो. यात अनेक महिलांना जीवही गमवावा लागतो. अशा परिस्थितीत, म्हस्के कुटुंबाकडे पाहिल्यानंतर त्यांच्या जिद्दीला सलामच केला पाहिजे. 

परीक्षा देऊन आम्ही तिघीही पोलिस अधिकारी झालो आहोत. या यशात आई-वडील व भावाचा मोठा वाटा आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळेच आज आम्ही इथपर्यर्ंत येऊ शकलो. त्यातही पोलिस खात्याची कसलीही पार्श्‍वभूमी नसताना एका कुटुंबातील आम्ही तिघी पोलिस अधिकारी असल्याचा अभिमान वाटतो.    - गिरिजा म्हस्के, पोलिस उपनिरीक्षक

- अक्षय फाटक