Wed, May 22, 2019 20:16होमपेज › Pune › धमकीचे कॉल होणार रेकॉर्डिंग; गुन्हेही दाखल होणार

धमकीचे कॉल होणार रेकॉर्डिंग; गुन्हेही दाखल होणार

Published On: Feb 17 2018 2:08AM | Last Updated: Feb 17 2018 1:09AMपुणे : प्रतिनिधी

न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिका प्रशासनाने शहरातील अनधिकृत होर्डिग्ज, जाहिरात फलकांवर जोरदार कारवाई सुरू केली, मात्र, कारवाई करणार्‍या अधिकारी आणि कर्मचारी यांना दमबाजी करण्याचे प्रकार वाढले असून त्यामुळे कर्मचार्‍यांमध्ये भितीचे वातारवरण पसरले आहे. त्यावर आता  कारवाई दरम्यान निरीक्षकांना आलेले फोन कॉल्स रेकॉर्ड करून धमकी देणार्‍याविरोधात थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. आकाशचिन्ह आणि परवाना विभागाचे प्रमुख उपायुक्त तुषार दौंडकर यांनी यासंबधीची माहिती दिली. 

शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिग आहेत, त्याचबरोबर राजकिय पक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून नेत्यांच्या अभिनंदनाचे फलक लावून  शहराचे विद्रूपीकरण करण्याचे उद्योग सुरू होते. त्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने अशा विद्रुपीकरण करणार्‍या जाहीरातबाजांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार प्रशासनाने गेल्या दिड महिन्यांत 100 हून अधिक विद्रूपीकरणाचे गुन्हे दाखल केले आहेत. तसेच ही कारवाई अधिक जोमाने प्रशासनाने सुरू केली आहे.  

महापालिकेच्या या कारवाईमुळे अनेक लोकप्रतिनिधी, त्यांचे कार्यकर्ते आणि अनधिकृत होर्डिगधारक अडचणीत आले आहेत.  त्यामुळे आता कारवाईसाठी गेलेल्या निरिक्षकांना थेट मोबाईलवरून धमकी देण्याचे प्रकार वाढले आहेत.  या धमक्यांमुळे निरिक्षक धस्तावलेले असून त्याचा थेट परिणाम कारवाईवर होऊ लागला आहे.  

त्यावर तोडगा म्हणून निरीक्षकांना येणार्‍या सर्व मोबाईल कॉल्सचे रेकॉर्डिंग करण्याचा सुचना देण्यात आल्या असून धमकी देणार्‍यांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, तसेच  त्याचा पुरावा म्हणून हे रेकॉर्ड सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे दौंडकर यांनी सांगितले.