Sun, Jul 21, 2019 10:04होमपेज › Pune › हजारो भाविक विठ्ठल चरणी लीन

हजारो भाविक विठ्ठल चरणी लीन

Published On: Jul 24 2018 1:09AM | Last Updated: Jul 23 2018 11:46PM
पुणे : प्रतिनिधी

बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल... माझे माहेर पंढरपूर, अजी सोनियाचा दिन, अशा भक्तिगीतांनी दिवसाची सुंदर सुरुवात झाली. देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त पुण्यातील विठ्ठल मंदिरातून अभंगांचे सूर कानी पडत होते. विठूमाउलीच्या दर्शनासाठी भक्‍तिसागर लोटला होता. पहाटेपासूनच महाआरती, महापूजा याबरोबरच पांडुरंगाला अभिषेक घालण्यात आला. आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी भाविकांनी विठ्ठलाकडे साकडे घातले. पावसाने उघडीप दिल्याने भाविकांनी सकाळपासूनच मंदिरात गर्दी केली होती. 

नवी पेठ येथील श्री मराठा मंडळाच्या वतीने पहाटेपासूनच आषाढी एकादशीच्या पूजेची तयारी सुरू होती. मंदिराला आकर्षक पानांनी सजविण्यात आले होते. पुष्पहारांनी विठ्ठलाची मूर्ती पूर्णपणे झाकली होती. पहाटे साडेपाच वाजता मंदिराचे अध्यक्ष सुभाष तोंडे व बाळासाहेब काळभोर यांच्या हस्ते महापूजा व अभिषेक करण्यात आला. महापूजेनंतर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. या प्रसंगी भाविकांना राजगिरा लाडू, केळी वाटप करण्यात आली. दुपारी 3 ते 4 दरम्यान भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता; तसेच सायंकाळी 7 च्या सुमारास महाआरती करण्यात आली, अशी माहिती मंदिराचे माजी विश्‍वस्त नितीन नवले यांनी दिली.

सिंहगड रस्ता येथील श्री क्षेत्र विठ्ठलवाडी (प्रतिपंढरपूर) येथे भाविकांचा अलोट भक्तिसागर लोटला होता. मंदिर परिसराला परिसराला यात्रेचे स्वरूपच आले होते. परिसरात भाविकांच्या स्वागतासाठी विविध पक्षांचे स्वागतकक्ष उभारण्यात आले होते; तसेच वाहतूक पोलिस व संरक्षक पोलिसही येथे तैनात होते. नागरिकांच्या संरक्षणासाठी पोलिस मदत केंद्र उभारण्यात आली होते. या वेळी साबूदाणा खिचडी वाटपासाठीही मांडव घालण्यात आले होते. या प्रसंगी स्वयंसेवी संस्था भाविकांच्या सेवेसाठी याठिकाणी सज्ज असल्याचे पाहायला मिळाले. मंदिरात मध्यरात्री मंदिर पदाधिकारी यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. पहाटे 4 वाजता महापूजा संपल्यानंतर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता भजन, कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

नाना पेठ येथील श्री निवडुंगा विठोबा मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही शुक्रवारी पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी पहाटे 5.30 वाजता काकडा आरती करण्यात आली. त्यानंतर विश्‍वस्त किशोर बाबर, अ‍ॅड. अरुण स्वामी यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. सकाळी 7 वाजता समर्थ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण वायकर यांच्या हस्ते विठूमाउलींची आरती करण्यात आली. त्यानंतर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. दुपारी महिला भजनी मंडळाचा भजन कार्यक्रम करण्यात आला; तसेच सायंकाळी ‘नारदीयकथा’ आयोजित केली होती. रात्री 8 वाजता धूप आरती करण्यात आली, तर रात्री 9 ते 11 वाजता मानकर शास्त्रींच्या पुराणाने संपूर्ण दिवसाच्या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला, अशी माहिती श्री निवडुंगा विठोबा मंदिर देवस्थान संस्थानचे व्यवस्थापक आनंद पाध्ये यांनी दिली.  

भवानी पेठ येथील विठ्ठल मंदिरातही दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते; तसेच फुलांच्या माळा, लाईटच्या माळा यांनी मंदिराची सजावट करण्यात आली होती. पहाटे सहा वाजता भवानी पेठ विठ्ठल मंदिर ट्रस्टचे विश्‍वस्त शिवाजी जगदाळे यांच्या  कुटुंबीयांच्या हस्ते अभिषेक, महापूजा करण्यात आली; तसेच मंदिराच्या पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. दिवसभर खिचडीच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. त्यानंतर रात्री भजन, हरिपाठाच्या कार्यक्रमाने कार्यक्रमांचा समारोप करण्यात आला, अशी माहिती मंदिराचे विश्‍वस्त गोरखनाथ भिकुले यांनी दिली.

आषाढी एकादशीनिमित्त लकडी पूल विठ्ठल मंदिर, पासोड्या विठोबा मंदिर व शहरातील अन्य मंदिरे विविध प्रकारे सजविण्यात आली होते. पहाटे वाजता मंदिराचे विश्‍वस्तांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. विठ्ठलाच्या मूर्तीला लोणी, दूध, तूप, मध, कस्तुरी यांनी महाअभिषेक घालण्यात आला. या प्रसंगी महाआरती करण्यात आली. या वेळी दर्शनासाठी मंदिरात येणार्‍या भाविकांना उपवासाचे पदार्थ वाटप करण्यात आले. सायंकाळी पुन्हा आरती करण्यात आली. सकाळी महापूजेनंतर रात्री 10 वाजेपर्यंत भजन, कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.