Thu, Mar 21, 2019 15:27



होमपेज › Pune › ‘पीएमपीएमएल’ बससेवा खराब असूनही साडेबावीस कोटींची खैरात

‘पीएमपीएमएल’ बससेवा खराब असूनही साडेबावीस कोटींची खैरात

Published On: Sep 06 2018 1:42AM | Last Updated: Sep 06 2018 1:33AM



पिंपरी ः प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरात पीएमपीएलची सार्वजनिक व्यवस्थेबाबत अनेक तक्रारी असतानाही पीएमपीएलला संचानल तुटीपोटी 3 महिन्यांसाठी आगाऊ 22 कोटी 50 लाखांचा निधी देण्यास स्थायी समितीने बुधवारी (दि.5) आयत्या वेळी मंजुरी दिली आहे. तसेच विविध विकासकामांच्या खर्चासाठी सुमारे 9 कोटी 83 लाखांच्या खर्चासही मान्यता देण्यात आली. 

सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या. पीएमपीएलला सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबर या 3 महिन्यांसाठी 22 कोटी 50 लाखांची आगाऊ रक्कम देण्यास समितीने मंजुरी दिली. पीएमएमपीएलच्या सेवेबाबत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. तोट्यात असल्याचे कारण देत शहरातील अनेक भागांत बस बंद  करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. तसेच सभांना पीएमपीएलचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहत नाहीत.

सार्वजनिक सेवेबाबत नगरसेवकांसमवेत बैठक घेण्याबाबत महापौर राहुल जाधव व स्थायी समिती अध्यक्षा गायकवाड यांनी 14 ऑगस्टला पत्र दिले आहे. मात्र, त्याबाबत पीएमपीएलच्या अध्यक्षा नयना गुंडे यांनी अद्यापपर्यंत कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. मात्र, पुण्याचा महापौर मुक्ता टिळक यांनी 1 ऑगस्टला पत्र दिल्यानंतर लगेच बैठक घेतली. त्यामुळे त्या पुणे व पिंपरी-चिंचवड पालिकेत भेदभाव करीत आहेत. हा महापौरांचा अपमान आहे, असे सदस्य राजू मिसाळ यांनी सांगितले. 

काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी बीआरटीच्या बस थांब्यासाठी 2 कोटी 84 लाख 59 हजार, कार्यशाळेत विविध वाहने दुरस्तीसाठी 95 लाख  आणि औंध रावेत रस्त्यावरील साई चौक येथील पुलास बाधा करणारी अति उच्चदाब वीजवाहिनी हलविण्यासाठी 53 लाख 63 हजार शुल्क महापारेषणला देण्यातस मान्यता देण्यात आली. वृक्षारोपणासाठी  2 हजार 500 रोपे खरेदीसाठी 15 लाख 71 हजार खर्चास मंजुरी देण्यात आली.

नयना गुंडे न आल्यास बस खरेदीचा विषय तहकूब करू

पीएमपीएलची सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम व्हावी म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिका 200 बस खरेदी करून पीएमपीएलला देणार आहे. हा विषय मंजुरीसाठी उद्या होणार्‍या सर्वसाधारण सभेपुढे आहे. या सभेला पीएमपीएलच्या अध्यक्षा नयना गुंडे उपस्थित न राहिल्यास सदर विषय तहकूब करण्यात येईल, असे महापौर राहुल जाधव यांनी बुधवारी सांगितले. 

आता सभा दर मंगळवारी

पालिकेमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर दर मंगळवारी होणारी सभा बुधवारी घेण्याची प्रथा सुरू करण्यात आली होती. मात्र, बुधवारच्या दिवशी व्यवस्थित कामकाज होत नसल्याचे समितीच्या लक्षात आले आहे. त्यामुळे या पुढे समितीची सभा पूर्वीप्रमाणे दर मंगळवारी दुपारी दोनला घेण्यात येणार आहे. समितीने पूर्वीच्या पदाधिकार्‍यांनी घेतलेले निर्णय बदलण्याचा सपाटा लावला आहे. त्यामध्ये आणखी एका निर्णयाचा समावेश झाला आहे. या निर्णयामुळे इतर विषय समितीच्या सभांचे नियोजन बदलावे लागणार आहे.