होमपेज › Pune › ‘दादां’नी ज्यांना मोठे केले त्यांनीच राष्ट्रवादीला दगा दिला

‘दादां’नी ज्यांना मोठे केले त्यांनीच राष्ट्रवादीला दगा दिला

Published On: Jul 23 2018 1:10AM | Last Updated: Jul 23 2018 12:54AMपिंपरी : प्रतिनिधी

संपूर्ण महाराष्ट्र अजित पवारांवर विश्वास टाकतो. अनेक वर्षे  राज्यात  शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या माध्यमातून अजित पवारांनी  मोठे काम उभे केले आहे. त्यांनी राज्यातील अनेक कार्यकर्त्यांना नेते केले. त्यांना मोठ-मोठी पदे दिली. परंतु दादांनी ज्यांची जास्त काळजी घेतली त्यांनीच राष्ट्रवादी काँग्रेसला दगा दिला अशी  टीका पिंपरी-चिंचवड शहरातील विद्यमान आमदारांसह राज्यातील दगा देणार्‍यांवर  विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे  यांनी केली.

भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात आयोजित युवक राष्ट्रवादी काँग्रेस  पश्चिम महाराष्ट्राच्या मेळाव्यात ते बोलत होते.  पिंपरी-चिंचवड शहरात  अख्खा देश दिसतो.  माजी केंद्रीय कृषीमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली अजित पवार यांनी या शहरात मोठा विकास   केला.  देशातील विविध राज्यांच्या कानाकोपर्‍यातील लोकांना रोजगार निर्माण झाला पाहिजे यासाठी पवार साहेब यांनी उद्योगधंदे आणले. त्यांना रोजगार निर्माण करून दिला. तरीही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार पराभूत होतात, याची खंत वाटते. आपल्याच जीवावर मोठे झालेल्या दामोजीपंतामुळे पराभव  झाला; मात्र  मी आपणास असा विश्वास देतो, राष्ट्रवादी काँग्रेसची  हवा निर्माण झाली आहे, त्याचा त्या ‘दामोजीपंताना’ निश्चित पश्चाताप होणार आहे; परंतु आता पुन्हा त्यांना पक्षात प्रवेश नाही. चित्रपटाच्या शेवटी जसा ‘दी एंड’ येतो तशीच अवस्था त्यांची होणार असल्याचा टोला त्यांनी यावेळी संबंधितांना लगावला.

सध्या राज्य सरकारमधील मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजप धांदात आणि रेटून खोटे बोलत आहेत. मी मुख्यमंत्र्यांना फडणवीस नव्हे तर ‘फसवणीस’ म्हणतो. सत्ताधार्‍याच्या काळात सामाजिक तेढ निर्माण होत आहेत. भीमा कोरेगाव येथे घडलेली हिंसाचाराची घटना, औरंगाबाद येथील दंगल, जळगाव येथे पाच जणांना चिरडून मारण्याच्या घटनेमुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था धुळीस मिळाली आहे. मुंबईचा आराखडा हा बिल्डरधार्जीण आहे. त्याबाबत उत्तर द्यायला विधानसभेत सत्ताधारी न आल्याने ते पळपुटे असल्याचे सिध्द झाल्याचा हल्लाबोल मुंडे यांनी केला. 

दादांचा पुढील वाढदिवस आषाढीला यावा

आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला अजित पवार यांचा  वाढदिवस आपण साजरा करतोय. त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. 22  जुलैला दादांचा वाढदिवस आणि 23  जुलैला आषाढी एकादशी. नियतीच्या मनात नेमके काय आहे? 2020 च्या आषाढी एकादशी दिवशी वाढदिवस यावा आणि पांडुरंगाची पूजा दादांनी मुख्यमंत्री म्हणून करावी, हीच आषाढी एकादशी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतो, असे धनंजय मुंडे यांनी बोलताच  अजित पवारांच्या नावाने युवक कार्यकर्त्यांनी नाट्यगृह दणाणून सोडले.