होमपेज › Pune › इतिहास विसरणार्‍यांना इतिहास नसतो : देवेंद्र फडणवीस 

इतिहास विसरणार्‍यांना इतिहास नसतो : देवेंद्र फडणवीस 

Published On: Jul 24 2018 1:08AM | Last Updated: Jul 24 2018 1:08AMपिंपरी : प्रतिनिधी

क्रांतिवीरांच्या त्यागातून मिळालेल्या स्वातंत्र्याचे मोल आपल्याला समजायला हवे. इतिहास विसरणार्‍या समाजाला इतिहास नसतो हे लक्षात घ्यायला हवे. स्वराज्याची लढाई आपल्याला लढता आली नाही; पण सुराज्याची लढाई लढता येईल, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. चिंचवडगाव येथील क्रांतिवीर चापेकर स्मारक संग्रहालयाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोमवारी झाले ते त्यावेळी ते बोलत होते.

या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, आयुक्त श्रावण हर्डीकर, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, माजी महापौर अपर्णा डोके आदी उपस्थित होते.पालकमंत्री बापट म्हणाले की, लोकांनी आमच्यावर टाकलेला विश्वास सार्थ करू. मेट्रो, भामा आसखेडमधून पाणी, पवना बंद नळ योजना मार्गी लावण्यात येईल. प्रास्ताविक पक्षनेते एकनाथ पवार यांनी केले. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले.

प्रोटोकॉल पायदळी : राहुल कलाटे

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर भाजपच्या कार्यकर्त्यांची तोबा गर्दी झाली होती. अनेक कार्यकर्ते पहिल्या रांगेत बसले होते, तर पदाधिकारी व नगरसेवकांना मागच्या रांगेत बसण्याची वेळ आली. अनेक नगरसेवकांना व्यासपीठावर स्थान मिळाले नाही. शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी प्रोटोकॉल पायदळी तुडवला गेल्याबद्दल कार्यक्रम संपल्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर व पक्षनेते एकनाथ पवार यांना धारेवर धरले.  

जिल्ह्याचा कारभार आजही पिंपरी-चिंचवडमधूनच : बापट

पिंपरी-चिंचवड ही श्रमिकांची, वीरांची, संतांची भूमी आहे. चिंचवडमधून जिल्ह्याचा कारभार चालायचा;  मात्र आम्ही प्रचार व प्रसार यात कमी पडलो, असे आ. जगताप यांनी भाषणात सांगितले. त्याचा उल्लेख करून पालकमंत्री बापट म्हणाले, आजही जिल्ह्याचा कारभार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, आझम पानसरे हे त्रिकुटच चालवते. ते माझ्या कानात सांगतात आणि मी मुख्यमंत्र्यांच्या कानात सांगतो.