Wed, Mar 27, 2019 00:25होमपेज › Pune › यंदा पीएसआय परीक्षेचा ‘कटऑफ’ घरसला

यंदा पीएसआय परीक्षेचा ‘कटऑफ’ घरसला

Published On: Jul 12 2018 1:42AM | Last Updated: Jul 12 2018 1:25AMपुणे : प्रतिनिधी 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दि. 13 मे 2018 रोजी घेण्यात आलेल्या सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक संयुक्त पूर्वपरीक्षेपैकी पोलिस उपनिरीक्षक पदा (पीएसआय) साठीच्या पूर्वपरीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. यंदा या परीक्षेचा ‘कट्ऑफ’ घसरला असून सर्वसाधारण गटातून पुरुष उमेदवारांसाठी 44 तर महिला उमेदवारांत 36 एवढे गुण मिळविणारे उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. 

एमपीएससीद्वारे महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट - ब पूर्व परीक्षा 13 मे रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेतून पोलिस उपनिरीक्षक पदासाठी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकाच्या याद्या व या परीक्षेचा कटऑफही आयोगाने बुधवारी संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे. आयोगाद्वारे पीएसआय पदासाठी एकूण 387 जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. मुख्य परीक्षेसाठी एकूण 7 हजार 618 उमेदवार पात्र ठरल्याचे आयोगातर्फे जाहीर करण्यात आलेल्या निकालामध्ये स्पष्ट करण्यात आले. 

यामध्ये पुणे केंद्रातून परीक्षा दिलेल्या सर्वाधिक 3 हजार 110 उमेदवारांचा समावेश आहे. त्याखालोखाल औरंगाबाद केंद्रावरील 537, कोल्हापूर केंद्रावरील 499, अहमदनगर केंद्रावरील 353, सांगली केंद्रावरील 313 उमेदवारांचा समावेश आहे.

या परीक्षेचा कटऑफ खुल्या वर्गातील पुरुष उमेदवारांसाठी 44, महिला गटांसाठी 36 इतका आहे. अनुसूचित जाती गटाचा कटऑफ 43, अनुसूचित जमाती संवर्गाचा 38, इतर मागास वर्ग गटाचाही 44 इतका कटऑफ असल्याचे आयोगाने कळविले आहे. मुख्य परीक्षेचा संयुक्‍त पेपर क्रमांक एक दि. 26 ऑगस्ट 2018 रोजी होणार असून पात्र उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.