Tue, Jul 23, 2019 10:32होमपेज › Pune › यंदा प्रथमच पालिकेऐवजी लोकप्रतिनिधींकडून भेटवस्तू

यंदा प्रथमच पालिकेऐवजी लोकप्रतिनिधींकडून भेटवस्तू

Published On: Jul 06 2018 1:34AM | Last Updated: Jul 06 2018 1:12AMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आषाढी वारीतील दिंडीप्रमुखांना देण्यात येणारी भेटवस्तूची परंपरा यंदा खंडित होता होता राहिली. मात्र, ही भेटवस्तू म्हणजे ताडपत्री पालिकेऐवजी प्रथमच लोकप्रतिनिधी म्हणजे नगरसेवकांच्या मानधनातून दिली जाणार आहे. उद्या शुक्रवारी (दि. 6) सकाळी गुजरात, अहमदाबाद येथून ताडपत्री शहरात दाखल होणार आहेत. दरवर्षी पालिकेच्या वतीने जगद्गगुरू संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यातील एकूण 650 नोंदणीकृत दिंडीप्रमुखांना भेटवस्तू दिली जाते. पालिकेने गेल्या वर्षी दिंडीप्रमुखांना ताडपत्री भेट दिली होती. 3 हजार 428 रुपये दराच्या ताडपत्रीसाठी एकूण 22 लाख 18 हजार खर्च झाला होता.  मात्र, यंदा उच्च न्यायालयाचे आदेश व राज्य शासनाच्या अध्यादेशामुळे भेटवस्तू खरेदी करता येत नसल्याने पालिका प्रशासनाने त्यातून अंग काढून घेतले आहे. भेटवस्तू खरेदी न करण्याचा निर्णय आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतला आहे. त्यामुळे नगरसेवकांच्या मानधनातून ताडपत्री खरेदी करण्याचा निर्णय गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला.  कमी कालावधीत तंबूऐवजी ताडपत्री निश्‍चित करण्यात आली. 

या ताडपत्रीचा आकार 15 बाय 9 फूट असून, त्याचा दर 2 हजार रुपयापर्यंत आहे. मात्र, मागील वर्षीप्रमाणे आकार व दर्जा वेगळा असल्याने या ताडपत्रीचा दर कमी असल्याचा दावा पदाधिकार्‍यांनी केला आहे. यंदा प्रथमच पालिका प्रशासनाकडून भेटवस्तू खरेदी न करता लोकप्रतिनिधींकडून ती खरेदी केली जात आहे. त्यामुळे भेटवस्तू देण्याची परंपरा यंदा खंडित झालेली नाही.